PV Sindhu: दुखापतीवर मात करत पीव्ही सिंधूची विजयी सलामी; मलेशिया ओपनच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये धडक

पायाच्या दुखापतीमुळे दीर्घकाळ कोर्टपासून लांब राहिलेल्या सिंधूने मलेशिया ओपन सुपर 1000 स्पर्धेत दमदार पुनरागमन करत प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.

PV Sindhu: दुखापतीवर मात करत पीव्ही सिंधूची विजयी सलामी; मलेशिया ओपनच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये धडक

Malaysia Open Super 1000: भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने नवीन वर्षाची धडाक्यात सुरुवात केली आहे. पायाच्या दुखापतीमुळे दीर्घकाळ कोर्टपासून लांब राहिलेल्या सिंधूने मलेशिया ओपन सुपर 1000 स्पर्धेत दमदार पुनरागमन करत प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. 30 वर्षीय सिंधूने तिच्यातील लढाऊ वृत्तीचे दर्शन घडवत पहिल्या फेरीत चायनीज तैपेईच्या सुंग शुओ युनचा पराभव केला.

दुखापतीनंतरचे यशस्वी पुनरागमन

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पायाला झालेल्या दुखापतीमुळे सिंधू बॅडमिंटनपासून दूर होती. पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी तिने सर्व बीडब्ल्यूएफ (BWF) वर्ल्ड टूर स्पर्धांमधून माघार घेतली होती. मात्र, नव्या वर्षात पूर्ण क्षमतेने परतलेल्या सिंधूने जागतिक क्रमवारीत 18 व्या स्थानावर असूनही सुंग शुओ युनला कारकिर्दीत दुसऱ्यांदा नमवले.

हेही वाचा – T20 World Cup: बांगलादेशला ICC चा सर्वात मोठा दणका; वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी भारताचाच रस्ता धरावा लागणार

पहिल्या सेटमध्ये वर्चस्व, दुसऱ्यात संघर्ष

सिंधू आणि सुंग शुओ युन यांच्यातील हा सामना 51 मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत 21-14 अशा फरकाने एकतर्फी विजय मिळवला. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये सुंग शुओ युनने जोरदार प्रत्युत्तर दिले. उभय खेळाडूंमध्ये अटीतटीची लढत झाली, पण अनुभवाच्या जोरावर सिंधूने हा सेट 22-20 असा जिंकून सामन्यावर शिक्कामोर्तब केले. आता पुढच्या फेरीत तिचा सामना जपानच्या 9 व्या मानांकित टोमोका मियाझाकीशी होणार आहे.

हेही वाचा – Vijay Hazare Trophy: शतक हुकलं पण मन जिंकलं ! दुखापतीनंतर मैदानात उतरताच श्रेयस अय्यरची तुफान खेळी; 53 चेंडूत काढल्या 'इतक्या' धावा

ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टोचे आव्हान संपुष्टात

सिंधूने विजय मिळवला असला तरी, मिश्र दुहेरीत भारताला अपयश आले. ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो या जोडीला पहिल्याच फेरीत अमेरिकेच्या प्रेस्ली स्मिथ आणि जेनी गाय यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. भारतीय जोडीने पहिला सेट 15-21 असा गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये 21-18 अशी बाजी मारत पुनरागमन केले होते. मात्र, निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये त्यांना 15-21 ने पराभव पत्करावा लागला आणि त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number