Strait of Hormuz: ‘काय करायचे हे केवळ आम्हीच ठरवू…’; युद्धविरामानंतर हॉर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबत इराणचं मोठं वक्तव्य

भारतात इराणचे प्रतिनिधी असलेले डॉ. अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी 'हॉर्मुझ सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) पुन्हा खुली करण्याबाबत इराणची भूमिका स्पष्ट केली आहे.

Strait of Hormuz: ‘काय करायचे हे केवळ आम्हीच ठरवू…’; युद्धविरामानंतर हॉर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबत इराणचं मोठं वक्तव्य

Strait of Hormuz: अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर मध्यपूर्वेत शांततेची आशा निर्माण झाली असली तरी, दोन्ही देशांमधील वाकयुद्ध अद्याप शमलेले नाही. भारतात इराणचे प्रतिनिधी असलेले डॉ. अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी ‘हॉर्मुझ सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) पुन्हा खुली करण्याबाबत इराणची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘हॉर्मुझबाबतचा निर्णय पूर्णपणे इराणच्याच हातात आहे आणि भविष्यात काय करायचे, हे केवळ आम्हीच ठरवू,’ अशा कडक शब्दांत त्यांनी जागतिक समुदायाला संदेश दिला आहे.

‘युद्धापूर्वी हॉर्मुझ मार्ग खुलाच होता’
डॉ. इलाही यांनी नमूद केले की, या संघर्षापूर्वी हॉर्मुझ सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी पूर्णपणे खुली होती आणि कोणालाही तिथे अडचणी येत नव्हत्या. मात्र, अमेरिकेच्या आक्रमक कृतीमुळे आणि लादलेल्या युद्धामुळे या मार्गावर गुंतागुंतीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. हा युद्धविराम सध्या केवळ काही दिवसांसाठी असला तरी, अमेरिकेने या अनुभवातून धडा घेतला असेल आणि ते पुन्हा संघर्ष उफाळून आणणार नाहीत, अशी अपेक्षा इराणने व्यक्त केली आहे.

अमेरिकेने इराणवर केले 10,000 हून अधिक हल्ले
अमेरिकेवर हल्लाबोल करताना डॉ. इलाही म्हणाले की, ‘अमेरिकेने इराणवर 10,000 हून अधिक वेळा हल्ले केले असून यामध्ये नागरिक, घरे, मशिदी आणि रुग्णालयांना लक्ष्य करण्यात आले. केवळ 3 दिवसांत इराणला नमवू अशा भ्रमात असलेल्या अमेरिकेला आपली चूक उमजली आहे.’ इराणची संस्कृती नष्ट करण्याची घोषणा करणाऱ्यांना मानवतेची समज नाही, अशी टीकाही त्यांनी केली. मिनाब येथील शाळेवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 170 निष्पाप मुलींचा बळी गेल्याचा दावा करत त्यांनी हे हल्ले शेजारील अरब देशांतील अमेरिकन तळांवरून झाल्याचे पुरावे असल्याचे सांगितले.

अरब देशांशी संघर्ष नाही, फक्त अमेरिकन तळांना लक्ष्य
इराणने स्पष्ट केले की, आमचा संघर्ष शेजारील अरब राष्ट्रांशी नसून त्यांच्या भूमीवर असलेल्या अमेरिकन लष्करी तळांशी आहे. ‘आम्ही कधीही कोणत्याही देशातील नागरिकांना लक्ष्य केले नाही. आम्हाला आमच्या शेजाऱ्यांशी उत्कृष्ट संबंध राखायचे आहेत,’ असे इलाही यांनी स्पष्ट केले. इराणच्या नागरिकांनी आपल्या पायाभूत सुविधांच्या रक्षणासाठी ढाल म्हणून उभे राहून आपला निर्धार जगाला दाखवून दिला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा – India’s Statement On Ceasefire: भारताने इराण-अमेरिका युद्धविरामाचे केले समर्थन; शांततेसाठी ‘हाच’ योग्य मार्ग असल्याचे केले स्पष्ट

युद्धविराम मोडल्यास इराण अधिक सामर्थ्यवान होईल
जर अमेरिकेने पुन्हा शत्रुत्व पत्करले आणि हा युद्धविराम मोडला, तर इराण पूर्वीपेक्षाही अधिक सामर्थ्यवान होऊन उभा राहील, असा इशारा डॉ. इलाही यांनी दिला आहे. इराण एका ‘नवचैतन्याच्या पर्वातून’ जात असून कोणत्याही आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचे त्यांनी सांगितलं. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number