Pune-Mumbai Missing Link: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील (Expressway) बोरघाटातील वळणदार रस्ते आणि वाहतूक कोंडीचा त्रास लवकरच संपणार आहे. बहुप्रतीक्षित 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे काम आता शेवटच्या टप्प्यात आले असून, येत्या मे 2026 मध्ये हा मार्ग प्रवाशांसाठी खुला होण्याची दाट शक्यता आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे दरम्यानचे अंतर 6 किलोमीटरने कमी होणार असून प्रवासाच्या वेळेत तब्बल 30 मिनिटांची बचत होणार आहे.
93 टक्के काम पूर्ण
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) माध्यमातून हा प्रकल्प राबवला जात आहे. यंदा ऑक्टोबरपर्यंत लांबलेल्या पावसामुळे दरीपुलाच्या कामात काही अडथळे आले होते. मात्र, पाऊस ओसरताच कामाला प्रचंड गती मिळाली आहे. सध्या दरीपुलावरील केबल बसवण्याचे 93 टक्के काम पूर्ण झाले आहे. एकूण 240 केबल्सपैकी सुमारे 150 केबल्स यशस्वीरित्या बसवण्यात आल्या आहेत.
हा प्रकल्प अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना मानला जात आहे. या प्रकल्पात देशातील सर्वाधिक, म्हणजे सुमारे 181 मीटर उंचीचा भव्य दरीपूल उभारण्यात आला आहे. घाटातील अंतर कमी करण्यासाठी 1.68 किमी आणि 8.87 किमी लांबीचे दोन अवाढव्य बोगदे तयार करण्यात आले आहेत. 2019 मध्ये या प्रकल्पाचा खर्च 6,900 कोटी रुपये होता, जो आता विलंब आणि इतर कारणांमुळे 7,500 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हायटेक यंत्रणा
दरम्यान, या प्रकल्पात बोगद्यातून प्रवास करताना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास बोगद्यात बसवलेले बटण दाबून थेट नियंत्रण कक्षाला (Control Room) माहिती देता येणार आहे. तसेच प्रवाशांना नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांशी थेट बोलता येईल, अशी यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे. तथापी, दर 300 मीटरवर क्रॉस पॅसेज देण्यात आले आहेत, जेणेकरून तातडीच्या वेळी वाहनचालकांना एका मार्गिकेवरून दुसऱ्या मार्गिकेवर जाणे सोपे होईल. सध्या खोपोली एक्झिट ते कुसगाव हे 19 किमी चे अंतर पार करण्यासाठी प्रवाशांना घाट चढून जावे लागते. मात्र, मे महिन्यात हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर हा प्रवास अत्यंत वेगवान आणि सुरक्षित होणार आहे.