Ashok Kharat Case: महिलांवर अत्याचार आणि बळजबरीने गर्भपात केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला भोंदूबाबा अशोक खरात सध्या पोलिसांना तपासात ठेंगा दाखवत आहे. शुक्रवारी पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाने खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत खरातने स्वीकारलेले 'मौन' ही त्याची कायदेशीर खेळी असल्याची चर्चा आता कायदेतज्ज्ञांमध्ये सुरू झाली आहे.
खरातचा 'सायलंट मोड'
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत सरकारी वकिलांनी न्यायालयात धक्कादायक माहिती दिली. अशोक खरात हा या संपूर्ण गुन्ह्याचा 'मास्टरमाईंड' असून तो पोलिसांना अजिबात सहकार्य करत नसल्याचे सांगण्यात आले. न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नांनाही तो केवळ "नाही" अशा एकाच शब्दात उत्तर देऊन गप्प बसत आहे. खरातने काहीही भाष्य केल्यास तपासाला नवी दिशा मिळेल आणि एसआयटी (SIT) अधिक खोलवर जाईल, हे ओळखून त्याने मौन पाळण्याची रणनीती आखली आहे.
पतसंस्थेतील 100 खात्यांचे गूढ; 60 कोटींचे व्यवहार
तपासादरम्यान अशोक खरातच्या आर्थिक साम्राज्याचे धक्कादायक धागेदोरे हाती लागले आहेत. कोपरगाव येथील 'समता नागरी सहकारी पतसंस्थे'त 57 खातेदारांची एकूण 100 खाती उघडण्यात आली असून, या सर्व खात्यांवर अशोक खरात हा 'वारसदार' (Nominee) आहे. या खात्यांमधून आतापर्यंत तब्बल 60 कोटी रुपयांची मोठी उलाढाल झाली आहे. विशेष म्हणजे, या सर्व खात्यांना अशोक खरातचाच मोबाईल नंबर लिंक करण्यात आला आहे.
'चाकणकर' नावाच्या खातेदारांमुळे चर्चांना उधाण
या 100 खात्यांपैकी 8 खाती स्वतः खरात कुटुंबाची आहेत. मात्र, उर्वरित खात्यांमध्ये 'चाकणकर' आडनाव असलेल्या व्यक्तींची खाती असल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये 'प्रतिभा चाकणकर' आणि अन्य एका चाकणकर नावाचा समावेश आहे. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचे नावही प्रतिभा असल्याने या प्रकरणाला आता राजकीय वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, पोलीस या खातेदारांच्या ओळखीबाबत अधिकृत भाष्य करण्यास सध्या टाळाटाळ करत आहेत.
हेही वाचा – Ashok Kharat Case: 'खरातसोबत त्या महिलांनाही दोषी ठरवा'; लेखिकेची मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी
कुटुंबीयांची चौकशी सुरू
अशोक खरात माहिती देण्यास नकार देत असल्याने आता 'एसआयटी'ने आपला मोर्चा त्याच्या कुटुंबीयांकडे वळवला आहे. खरातच्या नातेवाईकांची आणि निकटवर्तीयांची चौकशी करून या आर्थिक व्यवहारांमागील मूळ सूत्रधार शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.