Nobel Prize 2025: यंदाच्या नोबेल पुरस्कार मालिकेत मंगळवारी भौतिकशास्त्रातील विजेत्यांची घोषणा करण्यात आली. या वर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार तीन प्रख्यात वैज्ञानिकांना प्रदान करण्यात आला आहे. जॉन क्लार्क, मिशेल एच. डेव्होरेट आणि जॉन एम. मार्टिनिस या तिघांना क्वांटम तंत्रज्ञान आणि क्वांटम संगणन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी सन्मानित करण्यात आले आहे. या घोषणेसह नोबेल समितीने वैज्ञानिक क्षेत्रातील आणखी एक महत्त्वपूर्ण अध्याय जोडला आहे.
भौतिकशास्त्रातील नोबेलचा इतिहास
1901 पासून ते 2024 पर्यंत, एकूण 118 वेळा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला असून 226 शास्त्रज्ञांना हा सन्मान मिळाला आहे. गेल्या वर्षी कृत्रिम बुद्धिमत्तेतील अग्रणी जॉन हॉपफिल्ड आणि जेफ्री हिंटन यांना मशीन लर्निंगच्या पायाभूत संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आला होता.
हेही वाचा – India foreign policy: चीनच्या आर्थिक डावपेचामुळे वाढली अमेरिकेची डोकेदुखी; दोघांच्या वादात भारताला फटका
दरम्यान, सोमवारी वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. या क्षेत्रात मेरी ई. ब्रुंको, फ्रेड रॅम्सडेल आणि डॉ. शिमोन साकागुची यांना वैद्यकशास्त्रातील उल्लेखनीय कार्यासाठी गौरविण्यात आले. यानंतर, बुधवारी रसायनशास्त्र, गुरुवारी साहित्य, तर नोबेल शांतता पुरस्कार शुक्रवारी जाहीर होणार आहेत. अर्थशास्त्रातील नोबेल स्मृती पुरस्कार 13 ऑक्टोबर रोजी घोषित होणार आहे.
BREAKING NEWS
The Royal Swedish Academy of Sciences has decided to award the 2025 #NobelPrize in Physics to John Clarke, Michel H. Devoret and John M. Martinis “for the discovery of macroscopic quantum mechanical tunnelling and energy quantisation in an electric circuit.” pic.twitter.com/XkDUKWbHpz — The Nobel Prize (@NobelPrize) October 7, 2025
पुरस्कार समारंभ आणि पारितोषिक रक्कम
नोबेल पुरस्कारांचा पारंपरिक समारंभ 10 डिसेंबर रोजी होणार आहे. या दिवशी नोबेल पुरस्कारांचे संस्थापक अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी आहे. या प्रतिष्ठित पुरस्कारात विजेत्यांना 11 दशलक्ष स्वीडिश क्रोनर (सुमारे 1.2 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स) इतकी पारितोषिक रक्कम प्रदान केली जाते.