Kalpana Kharat Bail: महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या गंभीर आरोपाखाली अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिचा शोध पोलीस घेत असतानाच, तिच्या जामीन अर्जाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राहता सत्र न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनाचा निकाल पुन्हा एकदा लांबणीवर पडला असून, आता 22 एप्रिल ही नवी तारीख निश्चित करण्यात आली आहे. या विलंबामुळे पोलिसांच्या अटकेची टांगती तलवार अद्याप तिच्यावर कायम आहे.
न्यायालयात फिर्यादींच्या वकिलांची वेळ मागून सुनावणी स्थगित
आज न्यायालयात सुनावणी सुरू झाली तेव्हा आरोपीचे वकील आणि सरकारी पक्ष उपस्थित होते. मात्र, मूळ फिर्यादी रावसाहेब गोंदकर यांच्या वकिलांनी या प्रकरणात आपले सविस्तर म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. फिर्यादीच्या वकिलांची ही विनंती मान्य करत न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली. विशेष म्हणजे, सुनावणी दरम्यान आरोपीचे वकील उशिरा आल्याबद्दल न्यायालयाने कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली असून सुनावणीची प्रक्रिया आता पुढील आठवड्यात पार पडणार आहे.
कल्पना खरात अद्याप फरार; 'लुक आऊट' नोटीस जारी
शिर्डीतील जमीन खरेदी प्रकरणात फसवणूक केल्याचा ठपका ठेवत 31 मार्च रोजी कल्पना खरातवर गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून ती पोलिसांना गुंगारा देत फरार आहे. पोलिसांनी तिच्या विरोधात 'लुक आऊट' नोटीस जारी केली असून विविध पथके तिचा शोध घेत आहेत. एकीकडे पोलीस कारवाई तीव्र झाली असताना, दुसरीकडे ती वकिलांमार्फत जामिनासाठी कायदेशीर लढा देत आहे. मात्र, पोलिसांच्या तपासात ती सहकार्य करत नसल्याने तिच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अशोक खरातचे आर्थिक साम्राज्य 'SIT'च्या रडारवर; बँक घोटाळा उघड
नाशिकच्या भोंदूबाबाचा पाय आता अधिकच खोलात गेला आहे. एसआयटी (SIT) चौकशीत त्याचे अनेक धक्कादायक कारनामे उघड होत आहेत. केवळ महिलांचे शोषणच नव्हे, तर एका राष्ट्रीयीकृत बँकेशी संबंधित खरातचा नवा आर्थिक फ्रॉड समोर आला आहे. अनेक व्यावसायिकांनाही त्याने गंडवल्याचे निष्पन्न झाले असून त्याचे आर्थिक भागीदार आता एसआयटीच्या रडारवर आले आहेत. चौथ्या गुन्ह्यात खरातला 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, या काळात अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.