Ahmedabad Plane Crash: एअर इंडियाच्या AI-171 या विमानाला झालेल्या भीषण अपघाताला 1 वर्ष पूर्ण होण्याआधीच, मृतांच्या नातेवाईकांना दिल्या जाणाऱ्या नुकसानभरपाईच्या अटींवरून नवा वाद पेटला आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विजय रूपाणी यांच्या लंडनस्थित कन्या राधिका रूपाणी मिश्रा यांनी टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना पत्र लिहून या प्रक्रियेवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. अधिकृत तपास पूर्ण होण्यापूर्वीच एअर इंडिया पीडित कुटुंबांवर 'पूर्ण आणि अंतिम तडजोड' (Full and Final Settlement) करण्यासाठी दबाव का टाकत आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. या करारावर स्वाक्षरी केल्यास एअर इंडियासह बोईंग, जीई, सफ्रान, हनीवेल आणि सरकारी संस्थांनाही भविष्यातील दायित्वातून मुक्ती मिळणार असल्याने त्यांनी यावर आक्षेप घेतला आहे.
पीडित कुटुंबांवर कोणताही दबाव नाही; एअर इंडियाचा दावा
राधिका मिश्रा यांच्या या आरोपांना एअर इंडियाने अधिकृतपणे उत्तर दिले आहे. विमान कंपनीने स्पष्ट केले की, कोणत्याही कुटुंबावर हा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी ठराविक वेळेची सक्ती किंवा दबाव आणला गेलेला नाही. ज्या नातेवाईकांना 'एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो' (AAIB) चा अंतिम तपास अहवाल येईपर्यंत थांबायचे आहे, त्यांना तसे करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. अंतिम भरपाईची ही प्रक्रिया ऑक्टोबर 2025 मध्येच सुरू करण्यात आली होती. अपघातानंतर अवघ्या 2 महिन्यांतच कंपनीने ₹25 लाख रुपयांची अंतरिम मदत देण्यास सुरुवात केली होती, जी अंतिम नुकसानभरपाईच्या रकमेतून वजा केली जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत संवेदनशीलतेने आणि पारदर्शकतेने राबवली जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कायदेशीर दस्तऐवजातील भाषेबाबत एअर इंडियाचे स्पष्टीकरण
करारातील 'पावती, दायित्वमुक्ती आणि नुकसानभरपाई संरक्षण' (RDI) या दस्तऐवजातील अटींवरून निर्माण झालेल्या संभ्रमावर एअर इंडियाने पडदा टाकला आहे. कंपनीच्या मते, या दस्तऐवजात वापरलेली भाषा आंतरराष्ट्रीय आणि भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातील प्रमाणित नियमांनुसारच आहे. याचा उद्देश इतर त्रयस्थ कंपन्यांना (उदा. विमान किंवा इंजिन उत्पादक) पाठीशी घालणे हा नसून, एकदा अंतिम तडजोड झाल्यानंतर एअर इंडियाविरुद्ध भविष्यात कोणताही नवा दावा दाखल होऊ नये, एवढाच कायदेशीर सुरक्षेचा मार्ग सुनिश्चित करणे हा आहे.
260 प्रवाशांचा बळी घेणारी दुर्घटना आणि तपास अहवालाची प्रतीक्षा
12 जून 2025 रोजी अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केलेले एअर इंडियाचे AI-171 हे विमान कोसळले होते. या दुर्दैवी दुर्घटनेत प्रवासी आणि कर्मचारी मिळून एकूण 260 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. अपघातानंतर टाटा समूह, एअर इंडिया आणि 'एआय-171 मेमोरियल अँड वेल्फेअर ट्रस्ट'च्या माध्यमातून बाधित कुटुंबांना आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र, अनेक कायदेशीर तज्ज्ञ आणि कुटुंबे अंतिम अहवाल येण्यापूर्वी कोणत्याही करारावर स्वाक्षरी न करण्याचा सल्ला देत आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या माहितीनुसार, या अपघाताचा तपास आता अंतिम टप्प्यात असून, लवकरच अधिकृत अहवाल प्रसिद्ध केला जाईल. ज्यानंतर अपघाताचे नेमके कारण आणि जबाबदारी स्पष्ट होऊ शकेल.