India Nepal UPI NPI Link: भारत आणि नेपाळ या दोन्ही शेजारील देशांनी आर्थिक संपर्क क्षेत्रातील (Financial Connectivity) एका नव्या युगात पदार्पण केले आहे. भारताचे 'युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस' (UPI) आणि नेपाळचे 'नॅशनल पेमेंट्स इंटरफेस' (NPI) आता अधिकृतपणे एकमेकांशी जोडले गेले आहेत. या ऐतिहासिक करारामुळे दोन्ही देशांतील नागरिकांना एकमेकांमध्ये पैसे पाठवणे आणि स्वीकारणे कमालीचे सोपे झाले आहे. या नव्या प्रणालीद्वारे भारतात राहणारे नेपाळी आणि भारतीय नागरिक, तसेच नेपाळमधील भारतीय नागरिक थेट 'पर्सन-टू-पर्सन' (P2P म्हणजेच थेट एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला) पैसे पाठवू शकतील. विशेष म्हणजे हे सर्व व्यवहार 'रिअल-टाइम'मध्ये म्हणजेच अवघ्या काही सेकंदांत पूर्ण होतील. प्राथमिक टप्प्यात ही सेवा काही निवडक बँका पुरवत असून, लवकरच सर्व बँकांमध्ये याचा विस्तार केला जाईल.
आता बँक खात्याची कटकट नाही; फक्त मोबाईल नंबर पुरेसा
या नवीन डिजिटल सेवेची रचना अत्यंत सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात आली आहे. या प्रणालीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आता पैसे पाठवण्यासाठी समोरच्या व्यक्तीचा बँक खाते क्रमांक किंवा 'आयएफएससी' (IFSC) कोड यांसारख्या गोपनीय गोष्टींची गरज भासणार नाही. नागरिक आता केवळ मोबाईल क्रमांक किंवा 'व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस' (VPA) चा वापर करून थेट पैसे ट्रान्सफर करू शकतात. त्याचप्रमाणे, नेपाळमधून भारतात पैसे पाठवण्यासाठी नागरिक थेट त्यांच्या 'UPI ID' चा वापर करू शकतील, ज्यामुळे मानवी चुकांची शक्यता पूर्णपणे संपेल.
परदेशी चलन हस्तांतरण खर्च घटणार
या डिजिटल भागीदारीचा सर्वाधिक फायदा अशा लाखो कुटुंबांना होणार आहे, ज्यांचा उदरनिर्वाह परदेशातून येणाऱ्या पैशांवर (Remittance) अवलंबून असतो. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची आंतरराष्ट्रीय शाखा (NIPL) आणि नेपाळ क्लिअरिंग हाऊस लिमिटेड (NCHL) यांनी एकत्र येऊन हा अत्यंत स्वस्त आणि पारदर्शक मार्ग तयार केला आहे. सीमापार होणारे आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित, गतिमान आणि कमी खर्चात व्हावेत, या जागतिक स्तरावरील G20 परिषदेच्या उद्दिष्टांशी हा उपक्रम पूर्णपणे सुसंगत आहे.
काय म्हणतात दोन्ही देशांचे अधिकारी?
"हा उपक्रम जागतिक कनेक्टिव्हिटीच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. हा सुरक्षित मार्ग केवळ पैशांचे हस्तांतरण सोपे करणार नाही, तर आर्थिक समावेशनाला (Financial Inclusion) मोठी चालना देईल," असं NPCI इंटरनॅशनलचे एमडी आणि सीईओ रितेश शुक्ला यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या ऐतिहासिक भागीदारीवर आनंद व्यक्त करताना NCHL चे सीईओ निलेश मान सिंग प्रधान म्हणाले की, हा निर्णय दोन्ही देशांमधील घनिष्ठ सहकार्याचे उत्तम उदाहरण आहे. हा डिजिटल प्रवास भविष्यात अशा अनेक नवनवीन सेवांचा मार्ग मोकळा करेल, ज्याचा फायदा व्यावसायिक जगतासह सामान्य जनतेलाही मोठ्या प्रमाणात होईल.