God's Blessings for New Year 2026 : नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्याची भारतीय परंपरा असून, 2026 या नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराने कंबर कसली आहे. 1 जानेवारी रोजी सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता मंदिर प्रशासनाने नियोजनाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे, यंदा 1 जानेवारी पाठोपाठ 6 जानेवारी रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी येत असल्याने मंदिर न्यासाने दुहेरी तयारी केली आहे.
सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी विशेष नियोजन
प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी विविध रांगांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये आशीर्वचन पूजा रांग, गाभाऱ्यातून दर्शन घेणाऱ्यांसाठी सामान्य रांग, महिलांसाठी विशेष रांग आणि मुखदर्शन रांगेचा समावेश आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिला आणि नवजात बालके असलेल्या मातांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईतील महालक्ष्मी आणि मुंबादेवी मंदिरांतही दर्शनासाठी मोठी गर्दी अपेक्षित आहे. महालक्ष्मी मंदिराचे वरिष्ठ व्यवस्थापक नितीन कांबळी यांनी स्पष्ट केले की, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी रुग्णवाहिका, पोलीस बंदोबस्त आणि अतिरिक्त सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
सिद्धिविनायक मंदिरात दर्शन आणि आरतीची वेळा
दर्शन- पहाटे 03:15 ते 05:15
आरती- पहाटे 05:30 ते 6
दर्शन- सकाळी 6 ते दुपारी 12
नैवैद्य- दुपारी 12 ते 12:30
दर्शन- 12:30 ते सायंकाळी 7
धूपारती- सायंकाळी 7 ते 07:10
आरती – सायंकाळी 07:30 ते रात्री 8
दर्शन- 8 ते रात्री 11:30
देशभरातील प्रमुख देवस्थानांमध्ये भक्तांचा ओघ
केवळ मुंबईतच नाही, तर शिर्डी, अयोध्या, वैष्णोदेवी आणि तिरुपती अशा प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांवर 1 जानेवारी रोजी सुमारे 10 लाख भाविक हजेरी लावतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जाणून घ्या, कसं असेल मंदिरांतल्या दर्शनांचं नियोजन..
शिर्डी: साई बाबांच्या दर्शनासाठी 6 लाख भाविक येण्याची शक्यता असल्याने 31 डिसेंबर रोजी मंदिर रात्रभर उघडे ठेवले जाईल. गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी 31 डिसेंबर ची शेजारती आणि 1 जानेवारी ची काकड आरती होणार नाही, तसेच व्हीआयपी दर्शन देखील बंद ठेवण्यात आले आहे. भाविकांच्या सोयीसाठी 46,000 चौरस फुटांचा भव्य मंडप उभारण्यात आला असून त्यात 15,000 भक्त थांबू शकतील.
अयोध्या: रामनगरीत नववर्षासाठी सुमारे 2 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. अयोध्येत 50 मोठ्या एलईडी स्क्रीनद्वारे 'लाईव्ह' दर्शन दाखवले जाणार असून 1 जानेवारी पर्यंतचे सर्व हॉटेल बुकिंग 'फुल्ल' झाले आहे. प्रत्येक 2 तासांच्या स्लॉटमध्ये फक्त 400 पास दिले जात आहेत.
वैष्णोदेवी येथील सुरक्षा व्यवस्था
जम्मूतील वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या 1 लाख भाविकांच्या सोयीसाठी नवा स्कायवॉक सज्ज झाला आहे. येथे भाविकांना रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) कार्ड मिळवण्यासाठी कागदपत्रांची तपासणी करावी लागेल. कार्ड मिळाल्यावर 10 तासांत यात्रा सुरू करून 24 तासांत परतणे बंधनकारक आहे.
तिरुपती बालाजी मंदिरातील टोकन व्यवस्था
तिरुपती मंदिरात 30 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत केवळ आगाऊ बुकिंग (Advance Booking) असलेल्या भाविकांनाच प्रवेश मिळणार आहे. दर्शनासाठी आवश्यक असलेली 1.89 लाख टोकन आधीच वाटून संपली आहेत. केवळ टोकन असलेल्यांनाच दर्शन मिळू शकणार आहे.