CBSE Strong Action against Neerja Modi School, Jaipur : जयपूरमधील प्रसिद्ध 'नीरजा मोदी स्कूल'मध्ये 4 थीतल्या चिमुकल्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याच्या हृदयद्रावक घटनेनंतर CBSE बोर्डाने कठोर पाऊल उचलले आहे. शालेय प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतचे अपयश गंभीर मानत बोर्डाने या शाळेची मान्यता तात्काळ प्रभावाने रद्द केली आहे.
तपासातील धक्कादायक वास्तव
1 नोव्हेंबर रोजी शाळेच्या 4 थ्या मजल्यावरून उडी मारून एका विद्यार्थिनीने आपले जीवन संपवले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी CBSE ने समिती नेमली होती. या समितीच्या अहवालात शाळेच्या भयंकर चुका समोर आल्या आहेत:
शेवटची 45 मिनिटे: आत्महत्येपूर्वी शेवटच्या 45 मिनिटांत ती मुलगी 5 वेळा आपल्या क्लास टीचरकडे मदतीसाठी गेली होती, परंतु शिक्षिकेने तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
बुलिंग (त्रास देणे): काही मुले तिला डिजिटल स्लेटवर अपमानास्पद मजकूर लिहून वारंवार त्रास देत होती. CCTV फुटेजमध्ये ती मुलगी मुलांकडे तो मजकूर पुसून टाकण्यासाठी गयावया करताना स्पष्ट दिसत आहे.
पालकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष
या चिमुकलीच्या पालकांनी जुलै 2024 मध्येच शाळेकडे 'बुलिंग'बाबत तक्रार केली होती. सप्टेंबर 2025 च्या PTM (पालक-शिक्षक सभा) मध्ये तर वडिलांनी स्वतः एका मुलाला आपल्या मुलीला त्रास देताना पाहिले होते. मात्र, त्या मुलावर कारवाई करण्याऐवजी शिक्षिकेने पालकांनाच उलट सल्ला दिला की, "मुलीने परिस्थितीशी जुळवून घेतले पाहिजे (Adjust)." शाळेची ही असंवेदनशील भूमिका चिमुकलीच्या जीवावर बेतली.
हेही वाचा – India Education Update: आता घरबसल्या बना 'डेटा सायंटिस्ट'; IGNOU कडून नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू
विद्यमान विद्यार्थ्यांच्या भविष्याचे काय?
मान्यता रद्द केल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे, मात्र CBSE ने विद्यार्थ्यांसाठी काही विशेष तरतुदी केल्या आहेत:
– सत्र 2025-26: सध्या 10 वी आणि 12 वीत असलेले विद्यार्थी याच शाळेतून आपली बोर्डाची परीक्षा देऊ शकतील.
– सत्र 2026-27: सध्या 9 वी आणि 11 वीत असलेल्या विद्यार्थ्यांना जवळच्या इतर शाळांमध्ये स्थलांतरित केले जाईल.
– नवीन प्रवेश बंद: शाळा आता कोणतेही नवीन प्रवेश घेऊ शकणार नाही किंवा खालच्या वर्गातील मुलांना 9 वी किंवा 11 वीत प्रमोट करू शकणार नाही.
– पुनर्मान्यता: वर्ष 2027-28 नंतर शाळा पुन्हा मान्यतेसाठी अर्ज करू शकते, पण त्यासाठी सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल.
शाळा ही विद्यार्थ्यांसाठी एक सुरक्षित जागा असावी
CBSE ने म्हटले आहे की, शाळा ही मुलांसाठी सुरक्षित आश्रयस्थान असायला हवी, मात्र नीरजा मोदी स्कूलने सुरक्षा प्रोटोकॉलचे गंभीर उल्लंघन केले आहे. शाळेतील समुपदेशन (Counseling) आणि तक्रार निवारण यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्याचे बोर्डाच्या निदर्शनास आले आहे.