Navratri 2025: मुंबईकरांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी आगामी 3 दिवसांसाठी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरण्याची विशेष परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिलेल्या आदेशानुसार, सप्तमी (29 सप्टेंबर), अष्टमी (30 सप्टेंबर) आणि नवमी (1 ऑक्टोबर) या 3 दिवसांत सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत हे उपकरणे वापरण्याची मुभा असेल.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, या परवानगीचा वापर करताना ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. तसेच उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक आदेशांचे पालन करणे आवश्यक असून, कोणत्याही प्रकारे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये याची दक्षता घ्यावी. शासनाने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रांमध्ये ही परवानगी लागू होणार नाही.
या दरम्यान ध्वनी प्रदूषण नियम, 2000 मधील नियम 3 व 4 चे पालन करणे हे देखील आवश्यक आहे. नागरिक किंवा संबंधितांच्या तक्रारी आल्यास ध्वनी प्राधिकरणाला पर्यावरण संरक्षण कायदा, 1986 अंतर्गत कार्यवाही करण्याचा अधिकार राहील. आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. हा आदेश मुंबई उपनगर जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर (mumbaisuburban.gov.in) प्रसिद्ध करण्यात आला आहे, ज्याद्वारे आयोजकांना नियम व अटी समजून घेणे आणि त्यांचे पालन करणे अपेक्षित आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराबाबत आदेश जारी केला आहे. नवरात्रातील सप्तमी (२९ सप्टेंबर), अष्टमी (३० सप्टेंबर) आणि नवमी (१ ऑक्टोबर) या तीन दिवसांमध्ये सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत धार्मिक व सांस्कृतिक… — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 27, 2025
जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले की, नवरात्रोत्सवाच्या 3 महत्त्वाच्या दिवसांसाठी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मात्र, ठरवलेल्या ध्वनी मर्यादा आणि अटींचे पालन करणे अनिवार्य आहे. नागरिक आणि आयोजकांनी या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.