Tapovan Tree Cutting: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सुरू असलेल्या वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) अंतरिम स्थगिती दिली आहे. कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी वृक्षतोड गरजेची असल्याचे सरकारचे म्हणणे असले तरी, पर्यावरणाच्या मुद्द्यावरून लवादाने कठोर भूमिका घेतली आहे. या निर्णयामुळे शहरातील वृक्षप्रेमींना मोठा दिलासा मिळाला असून प्रशासकीय कामांच्या वेगावर आता मर्यादा आल्या आहेत.
28 एप्रिलपर्यंत वृक्षतोडीला मनाई
नाशिक शहरात कुंभमेळ्याच्या तयारीसाठी रस्ते रुंदीकरण आणि इतर पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. या कामांच्या आड येणारी अनेक जुनी झाडे तोडण्याची प्रक्रिया महापालिका आणि प्रशासनाकडून राबवली जात होती. मात्र, या वृक्षतोडीविरोधात पर्यावरण प्रेमींनी राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली होती. या प्रकरणावर सुनावणी करताना लवादाने आपला निर्णय राखून ठेवला असून, येत्या 28 एप्रिलपर्यंत एकही झाड तोडू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष
सरकारच्या वतीने न्यायालयात असा युक्तिवाद करण्यात आला की, कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यासाठी लाखो भाविक नाशिकमध्ये येतात. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि रहदारी सुलभ करण्यासाठी विकासकामे होणे आवश्यक आहे. मात्र, लवादाने पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन सध्या या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 28 एप्रिल 2026 रोजी होणार असून, त्या दिवशी लवाद काय अंतिम निर्णय देणार, याकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागले आहे.