Nasrapur Minor Girl Assault Case Update : नसरापूरमध्ये घडलेल्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येच्या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेला आता जवळपास एक ते दीड महिना उलटून गेला आहे. या अतिशय गंभीर प्रकरणातील मुख्य पीडितेच्या आई-वडिलांना सध्या प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी एकीकडे हे कुटुंब सातत्याने संघर्ष करत असतानाच, दुसरीकडे सोशल मीडियावर त्यांना लक्ष्य केले जात आहे. ‘आमचा विचार कोणी करतो का?’ असा अत्यंत वेदनादायी आणि उद्विग्न सवाल पीडित मुलीच्या वडिलांनी आता उपस्थित केला आहे.
सोशल मीडियावरील आक्षेपार्ह प्रतिक्रिया
आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या पीडित वडिलांच्या पोस्टवर सोशल मीडिया युजर्सकडून अत्यंत अमानुष प्रतिक्रिया येत आहेत. अत्यंत खालच्या पातळीवरील कमेंट्स करून त्यांना मानसिकदृष्ट्या खच्ची करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संपूर्ण महाराष्ट्र ज्या घटनेने हादरून गेला होता, त्या घटनेच्या पीडित कुटुंबाला अशा प्रकारे सोशल मीडियावर त्रास दिला जात असल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
न्यायासाठी सुरू असलेला लढा
घटना घडल्यापासूनच मुलीच्या कुटुंबीयांच्या मनातील आक्रोश आणि दुःख कायम आहे. गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी वडिलांनी यापूर्वी अनेक आंदोलने केली असून त्यांनी मूक मोर्चा देखील काढला होता. मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्र पोहोचवून त्यांनी न्यायाची आर्त हाक घातली आहे. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सोशल मीडियावर सुरू असलेला हा मानसिक छळ या पीडित कुटुंबाच्या जखमेवर मीठ चोळणारा आणि अमानुष ठरत आहे.