Nashik Hirawadi Jewellers Robbery CCTV Footage : नाशिकमधील हिरावाडी भागात 15 मे रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास एका सराफी दुकानात 6 सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. दुकान बंद करून सर्व दागिने बॅगेत भरण्याची तयारी सुरू असताना 3 दुचाकींवरून तोंडाला मास्क लावलेले हे दरोडेखोर आत घुसले. त्यांनी थेट बंदुका रोखून दुकानात उपस्थित असलेल्या तिघांना जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, दुकानाच्या मालकिणीने अजिबात न घाबरता दरोडेखोरांना जोरदार टक्कर दिली. त्यांच्या या अनपेक्षित रुद्रावतारामुळे दरोडेखोर दचकले आणि हाती लागेल तेवढेच दागिने घेऊन त्यांना तेथून पळ काढावा लागला. हा सर्व थरारक प्रकार दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
दुकान मालकीण आणि कर्मचाऱ्यांचा धाडसी लढा
दरोडेखोरांनी आत शिरताच दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार केला आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दुकानाच्या मालकीण आणि त्यांचे एक पुरुष सहकारी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. मालकिणीने काउंटरवरील प्लेट्स दरोडेखोरांच्या दिशेने फेकून मारल्या आणि थेट काउंटरवर चढून दरोडेखोरांवर झेप घेतली. याच झटापटीत पुरुष सहकाऱ्याने एका दरोडेखोराला धरून ठेवण्याचा प्रयत्न केला असता, दरोडेखोराने त्यांच्या डोक्यावर बंदुकीच्या मागच्या भागाने जोरदार प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केले. दुकान मालकीणीचा हा आक्रमक पवित्रा पाहून 6 दरोडेखोरांचे धाबे दणाणले आणि ते काही दागिन्यांच्या बॅगा घेऊन दुचाकीवरून पसार झाले.
पोलीस पथके दरोडेखोरांच्या मागावर; 2 जण ताब्यात
या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गोळीबार आणि मारहाणीत जखमी झालेल्या कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, 6 दरोडेखोर 3 दुचाकींवरून फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवून रात्री उशिरापर्यंत या प्रकरणातील २ संशयित दरोडेखोरांना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
पोलिसांनी गस्त वाढवावी
हिरावाडी परिसरामध्ये गेल्या काही दिवसापासून अज्ञात व्यक्तींचा वावर वाढला आहे. काही ठिकाणी घरांचे कुलप तोडणे, परिसराची रेकी करणे असे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक करत आहेत.