Mumbai Central Railway Station : अक्षम्य हलगर्जीपणा! मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर 6 महिन्यांपासून सुरक्षा यंत्रणा ठप्प

बॅग स्कॅनर मशीन बंद असल्याबाबत मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्याकडून पश्चिम रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना अधिकृत पत्र लिहून कळवले होते. तरीही, याबाबत अद्याप काहीही कारवाई झालेली नाही.

Mumbai Central Railway Station : अक्षम्य हलगर्जीपणा! मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर 6 महिन्यांपासून सुरक्षा यंत्रणा ठप्प

Mumbai Central Railway Station : मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसवर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागील सहा महिन्यांहून अधिक काळ येथील बॅग स्कॅनर यंत्रणेचा पत्ता नसल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी मागवलेल्या माहितीनुसार, 27 जुलै 2024 पासून हे मशीन पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांची मोठी वर्दळ असलेल्या या स्थानकावर तपासणी यंत्रणाच नसेल, तर प्रवाशांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

रेल्वे पोलिसांच्या पत्राला केराची टोपली?
विशेष म्हणजे, बॅग स्कॅनर मशीन बंद असल्याबाबत मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एच. टी. कुंभार यांनी पश्चिम रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना अधिकृत पत्र लिहून कळवले होते. संभाव्य घातपात आणि संशयास्पद वस्तूंच्या धोक्याकडे पोलिसांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, या पत्रव्यवहारानंतरही पश्चिम रेल्वेकडून मशीन दुरुस्त करण्यासाठी किंवा नवीन यंत्रणा बसवण्यासाठी अद्याप कोणतीही पावले उचलली गेलेली नाहीत. रेल्वे प्रशासनाचे हे दुर्लक्ष प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – Traffic E-Challan Scam: मुंबईकरांनो सावधान! मोठा स्कॅम, प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियनच्या एका शोधामुळे घोटाळा समोर

पार्सल तपासणीचा खेळखंडोबा; दादरमध्येही तिच स्थिती
केवळ प्रवासी बॅगाच नव्हे, तर दादर आणि मुंबई सेंट्रल येथील पार्सल विभागात येणाऱ्या मालाची तपासणी करणारी यंत्रणाही कुचकामी ठरली आहे. माहिती अधिकारातून समोर आलेल्या तपशिलानुसार, पार्सल स्कॅनर मशीनअभावी येणाऱ्या-जाणाऱ्या मोठ्या सामानाची तपासणी न करताच ते प्रवासासाठी पाठवले जात आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनसमधून देशाच्या विविध कोपऱ्यात रेल्वे गाड्यांची ये-जा होत असल्याने, अशा प्रकारे विना तपासणी पार्सल वाहतूक होणे हे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक मानले जात आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेला घरघर
मुंबई सेंट्रल हे स्थानक 24 तास प्रवाशांनी गजबजलेले असते. दर 10 मिनिटाला लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांची हालचाल येथे होत असते. सीसीटीव्ही कॅमेरे असले तरी, बॅग स्कॅनर ही संशयास्पद वस्तू शोधण्यासाठीची पहिली आणि महत्त्वाची पायरी असते. मात्र, रेल्वे प्रशासन तांत्रिक बिघाडाचे कारण देऊन हात झटकत असल्याचे दिसत आहे. संभाव्य धोक्याची टांगती तलवार डोक्यावर असतानाही प्रशासन ढिम्म राहिल्याने संताप व्यक्त होत आहे. आता यावर रेल्वे मंत्रालय कधी दखल घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Tajas Express : गाजावाजा केलेल्या 'तेजस एक्सप्रेस'च्या तक्रारी वाढल्या, वाढत्या विलंबामुळे कोकणकर त्रस्त; आता केली 'ही' मागणी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number