Jogeshwari Terminus : मुंबईतील लांब पल्ल्याच्या प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे. सीएसएमटी (CSMT), दादर किंवा मुंबई सेंट्रल यांसारख्या मोठ्या स्थानकांवरील गर्दीचा भार कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने जोगेश्वरी येथे नवीन टर्मिनस उभारण्याचे काम वेगात सुरू केले आहे. या वर्षाच्या अखेरीस हे नवीन टर्मिनस प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
गर्दीच्या त्रासातून सुटका
सध्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांना उत्तर भारताकडे जाणारी गाडी पकडण्यासाठी वांद्रे किंवा मुंबई सेंट्रलपर्यंत प्रवास करावा लागतो. जोगेश्वरी टर्मिनस कार्यान्वित झाल्यानंतर प्रवाशांना त्यांच्या घराच्या जवळूनच रेल्वे पकडता येईल. या स्थानकावरून दररोज 12 जोड्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्या धावतील. प्रामुख्याने दिल्ली आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी हे टर्मिनस केंद्र ठरेल.
हेही वाचा – Sindhudurg Airport : कोकणच्या पर्यटनाला चालना! चिपी विमानतळाबाबत मोठा निर्णय
आधुनिक सोयीसुविधा
हे स्थानक 'अमृत भारत स्टेशन विकास योजने'चा भाग असून, 24 डब्यांची गाडी उभी राहू शकेल इतके मोठे प्लॅटफॉर्म येथे उभारले जात आहेत. राम मंदिर आणि जोगेश्वरी स्थानकाच्या दरम्यान रेल्वेच्या मोकळ्या जागेवर हे काम सुरू आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गापासून (Western Express Highway) जवळ असल्याने प्रवाशांना रिक्षा किंवा बसने येथे पोहोचणे सोपे जाईल.
हेही वाचा – Airoli-Katai Naka Freeway : आनंदाची बातमी! ऐरोली-कटाई नाका मार्गाचे 80 टक्के काम पूर्ण; प्रवासाचा वेळ वाचणार
प्रकल्पाचा खर्च आणि कामाची प्रगती
दरम्यान, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी एकूण 76.84 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सुरुवातीला हा खर्च 51 कोटी रुपये इतका होता, परंतु डिझाइनमधील बदल आणि वाढीव सुविधांमुळे खर्चात वाढ झाली आहे. सध्या स्थानकाची इमारत, सर्व्हिस बिल्डिंग आणि प्लॅटफॉर्मचे कव्हर शेड उभारण्याचे काम 90 टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले असून, लवकरच नवीन ट्रॅक टाकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मुंबईच्या रेल्वे जाळ्यातील हे नवीन टर्मिनस उपनगरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने 'गेम चेंजर' ठरणार आहे.