Mumbai Local : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेवरील सर्वाधिक काळ रेंगाळलेल्या कांदिवली ते बोरिवली दरम्यानच्या सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम अखेर यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. सव्वा तीन किलोमीटरच्या या नव्या टप्प्याला रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवला असून, आता खार ते बोरिवली दरम्यान पाचवी आणि सहावी अशा दोन्ही मार्गिका प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाल्या आहेत.
मेल-एक्स्प्रेसचा अडथळा दूर; लोकलला मिळणार मोकळा मार्ग
या प्रकल्पामुळे मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसवरून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांना आता बोरिवलीपर्यंत स्वतंत्र मार्ग उपलब्ध झाला आहे. पूर्वी मेल-एक्स्प्रेस आणि लोकल एकाच मार्गिकेवर असल्याने लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम व्हायचा. मात्र, आता सहाव्या मार्गिकेमुळे लांब पल्ल्याच्या गाड्या वेगळ्या ट्रॅकवरून धावतील, ज्यामुळे लोकल फेऱ्यांची संख्या वाढवणे आणि गाड्या वेळेवर चालवणे शक्य होणार आहे.
30 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर यश
हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 18 डिसेंबर 2025 ते 17 जानेवारी 2026 या काळात रात्रकालीन ब्लॉक्स घेऊन काम करण्यात आले. या मोहिमेत खालील तांत्रिक कामे यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली:
रुळांची जोडणी आणि पुलांचे मजबुतीकरण.
अत्याधुनिक सिग्नल यंत्रणेचे एकत्रीकरण.
ओव्हरहेड वायरचे विद्युतीकरण.
अतिक्रमणांचे आव्हान आणि एमयूटीपी-2 चा विजय
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (MRVC) 'एमयूटीपी-2' अंतर्गत मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान पाचवी-सहावी मार्गिका मंजूर करण्यात आली होती. मात्र, मुंबई सेंट्रल ते खार दरम्यान असलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्या आणि अतिक्रमणांमुळे हे काम कठीण झाले होते. त्यावर पर्याय म्हणून पश्चिम रेल्वेने खार ते बोरिवली या टप्प्यावर लक्ष केंद्रित करून हा भाग कार्यान्वित केला आहे.
प्रवाशांना नेमका काय फायदा होणार?
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी माहिती दिली की, या नव्या मार्गामुळे मेल-एक्स्प्रेसमुळे लोकल गाड्यांना आउटरला उभे राहावे लागणार नाही. तसेच स्वतंत्र मार्गिका मिळाल्याने भविष्यात नव्या लोकल फेऱ्या सुरू करणे सुलभ होईल. तसेच या नव्या मार्गीकेमुळे वेळत लोकल धावेल आणि प्रवाशांचा मनस्ताप कमी होईल.