Nagpur News : नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली असून, एका चिमुकल्या मुलीचा अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात अंत झाला आहे. नरसाळा गावातील स्मशानभूमीजवळ राहणाऱ्या एका मजूर कुटुंबावर हा दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण नागपुरात खळबळ उडाली आहे.
मध्यरात्री घडलेला भयंकर प्रकार
अनुष्का रवी मेळा असे या दुर्दैवी चिमुकलीचे नाव असून तिचे वय अवघे 6 ते 8 महिने होते. मूळचे मध्यप्रदेशातील असलेले हे कुटुंब उदरनिर्वाहासाठी नागपुरात मजुरीचे काम करत होते. नरसाळा स्मशानभूमीजवळील नाल्याकाठी असलेल्या झोपडपट्टीत हे कुटुंब वास्तव्यास होते. ही घटना रात्री 2 च्या सुमारास घडल्याचा अंदाज आहे. अनुष्का आपल्या आईच्या कुशीत गाढ झोपलेली असताना, अंधाराचा फायदा घेत एका अज्ञात हिंस्त्र प्राण्याने झोपडीत प्रवेश केला आणि तिला उचलून नेले.
मृतदेहाची भीषण अवस्था
काही वेळाने आईला जाग आली असता मुलगी जवळ नसल्याचे तिच्या लक्षात आले. घरच्यांनी आरडाओरडा करत शोध घेतला असता, झोपडीपासून काही अंतरावरच अनुष्काचा मृतदेह आढळला. हा मृतदेह अत्यंत छिन्नविच्छिन्न अवस्थेत होता. हल्लेखोर प्राण्याने चिमुकलीच्या शरीराचे लचके तोडले होते. प्राथमिक माहितीनुसार, शरीराचा साधारण 30 ते 40 टक्के भाग, विशेषतः छाती आणि हाताचा भाग प्राण्याने खाल्ला होता, जे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
हल्लेखोर नक्की कोण?
हा हल्ला नेमका कोणत्या प्राण्याने केला, याबाबत अद्याप गूढ कायम आहे. परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठा आहे, तसेच डुकरे किंवा एखादा वन्यप्राणी असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. घटनास्थळी रस्त्यावरची प्रकाशव्यवस्था नसल्याने आणि सर्वत्र अंधार असल्याने प्राण्याला सहज शिकार करता आली. हुडकेश्वर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून वनविभागालाही पाचारण करण्यात आले आहे.
मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
बाहेरगावाहून आलेल्या या गरीब मजूर कुटुंबांच्या सुरक्षेबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे पुरेशी पथदिव्यांची सोय नाही. या घटनेनंतर परिसरात कमालीची दहशत पसरली असून इतर मजूर कुटुंब आता रात्र जागून काढत आहेत. प्रशासनाने या हिंस्त्र प्राण्याचा तातडीने बंदोबस्त करावा आणि मजुरांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
हेही वाचा – Akola Accident News: अकोल्यात भीषण अपघात! मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटले अन् 11 जण गंभीर जखमी तर…