Sanjay Khodke Accident: अमरावतीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांचा भीषण अपघात झाला असून, ते या अपघातात जखमी झाले आहेत. अमरावती शहरातील एका चौकात ही घटना घडली असून या अपघाताचे थरारक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
दुचाकीला कारची जोरदार धडक
मिळालेल्या माहितीनुसार, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय खोडके हे शनिवारी सकाळी आपल्या दुचाकीवरून कार्यकर्त्यांच्या बैठकीला जात होते. यावेळी रस्त्यावर अचानक एक कार समोर आली आणि संजय खोडके यांची दुचाकी त्या कारला जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, आमदार खोडके काही अंतर हवेत फेकले गेले आणि रस्त्यावर कोसळले.
हेही वाचा – Shalinitai Patil Passes Away: राजकीय क्षेत्रात शोककळा! ज्येष्ठ काँग्रेस नेत्या शालिनीताई पाटील यांचे निधन
रुग्णालयात उपचार सुरू
अपघातानंतर त्यांना तातडीने अमरावती येथील रिम्स (RIMS) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या अपघातात त्यांच्या पायाला आणि मणक्याला दुखापत झाली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
काळजी करू नका…; संजय खोडके यांचे भावनिक आवाहन
दरम्यान, रुग्णालयात उपचार घेत असतानाच संजय खोडके यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'माझी प्रकृती सध्या ठीक आहे, कार्यकर्त्यांनी काळजी करू नये. उद्या अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा नियोजित मेळावा आहे, तो पूर्ण ताकदीने यशस्वी करावा.' त्यांच्या या आवाहनामुळे कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.