Pune Crime: सत्तेची हवा डोक्यात गेल्यावर माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो, याचे संतापजनक उदाहरण पुण्यात समोर आले आहे. राज्याचे मंत्री अतुल सावे यांचे विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) विजय धुलचंद कारंडे यांनी स्वतःच्या पत्नीला आणि चिमुरड्या मुलाला बॅटने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. “मी मंत्र्यांचा खास आहे, माझे कुणीही वाकडे करू शकत नाही,” अशी धमकी देत पत्नीचा छळ करणाऱ्या कारंडेंवर आता खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून, खुद्द मंत्री अतुल सावे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
नेमकी घटना काय?
पुण्यातील क्वीन्स गार्डन निवासस्थानी 30 एप्रिल रोजी हे अंगावर काटा आणणारे कृत्य घडले. मिळालेल्या माहितीनुसार, कारंडे पत्नीला सोबत मुंबईला न नेता पुण्यातच ठेवत असतं. त्यांच्या मोबाइलमधील काही संशयास्पद चॅट्सबद्दल पत्नीने विचारणा केली आणि पासवर्ड मागितला, याच रागातून कारंडेंचा संयम सुटला. कारंडेंनी पत्नीला बॅटने इतके मारले की तिच्या हातापायावर निळे डाग पडले आहेत. आईला वाचवण्यासाठी मधे आलेल्या लहान मुलालाही त्यांनी सोडले नाही, त्यालाही बॅटने मारहाण केली. केवळ मारहाण करून न थांबता, कारंडेंनी पत्नीचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या वडिलांनी असाही आरोप केला आहे की, कारंडेंनी त्यांना धमकावून 25 लाख रुपयांची मागणी केली होती.
pic.twitter.com/4OhcQqanCO — Atul Save (@save_atul) May 6, 2026
मंत्र्यांची भूमिका: ‘अशा प्रवृत्तींना स्थान नाही’
आपल्या खासगी सचिवाने (OSD) केलेल्या या कृत्यामुळे मंत्री अतुल सावे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली. “विजय कारंडे याच्या पत्नीने केलेली तक्रार अत्यंत वेदनादायी आहे. महिला सक्षमीकरणाचा दावा करणाऱ्या महायुती सरकारमध्ये अशा हीन प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांना कोणतेही स्थान असणार नाही. मी तातडीने चौकशीचे आदेश दिले असून, दोषीला कठोरतम शिक्षा व्हावी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
पोलीस कारवाई आणि शोधमोहीम
पीडित पत्नीने हिंमत दाखवत कोरेगाव पार्क पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी विजय कारंडे यांच्यावर खुनाचा प्रयत्न (IPC 307), धमकी देणे आणि मारहाण करणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून कारंडे फरार असून पुणे पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.