Konkan Mhada House : गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहक अभावी रिक्त राहिलेल्या म्हाडाच्या (MHADA) घरांच्या विक्रीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. कोकण गृहनिर्माण मंडळाने राबवलेल्या विशेष विक्री मोहिमेला मोठे यश आले असून, विरार, बोळींज, गोठेघर आणि भंडार्ली येथील घरांच्या विक्रीतून म्हाडाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. यामुळे अनेक वर्षांपासून पडून राहिलेल्या घरांचा प्रश्न मार्गी लागला आहे.
केवळ 5 महिन्यांत 3500 हून अधिक घरांची विक्री
कोकण मंडळाने दिलेल्या आकडेवारीनुसार, विक्री अभावी पडून असलेल्या 5,376 घरांपैकी 3,768 घरांची विक्री प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे, यातील 3,570 घरांची विक्री केवळ गेल्या 5 महिन्यांच्या कालावधीत झाली आहे. यामध्ये 2014 मध्ये उभारलेली 1,410 जुनी घरे आणि 2014 ते 2020 या कालावधीत बांधलेल्या घरांनाही खरेदीदारांनी पसंती दर्शवली आहे.
विक्री वाढण्यामागील 3 मुख्य कारणे
विशेष सेल्स मोहीम: कोकण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली घरांच्या विक्रीसाठी मार्केटिंग आणि सेल्सची आक्रमक मोहीम राबविण्यात आली.
किमतीत सवलत: प्रदीर्घ काळापासून रिक्त असलेल्या घरांच्या किमतींमध्ये कपात करण्यात आली आणि खरेदीच्या अटींमध्ये शिथिलता दिल्याने सामान्यांचे घराचे स्वप्न आवाक्यात आले.
प्रशासकीय गती: मुख्य अधिकारी डॉ. विशाल राठोड यांच्या नेतृत्वाखाली कागदोपत्री प्रक्रिया सुलभ केल्याने ग्राहकांचे व्यवहार जलद गतीने पूर्ण झाले.
शिरढोण आणि खोणीची घरे पुन्हा लॉटरीत
कोकण मंडळाने बांधलेली शिरढोण येथील 5,320 आणि खोणी येथील 2,744 घरे अजूनही विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. 2025 च्या लॉटरीत या घरांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने, आता ही उर्वरित घरे आगामी नवीन लॉटरीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय म्हाडा प्रशासनाने घेतला आहे. "विशेष मोहिमेमुळे घरांच्या विक्रीला मोठी गती मिळाली आहे. भविष्यातही एकही घर रिकामे राहणार नाही, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील," असा विश्वास डॉ. विशाल राठोड यांनी व्यक्त केला आहे.