Hadapsar Bomb Scare: हडपसर भागातील एका खाजगी रुग्णालयात बुधवारी सायंकाळी घडलेल्या बॉम्बसदृश थराराने पुणे शहर हादरले होते. याप्रकरणी पुणे पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत एका संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, पकडण्यात आलेला हा आरोपी आरोग्य विभागाशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण ?
दरम्यान, बुधवारी संध्याकाळी रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये संशयास्पद वस्तू आढळल्यानंतर एकच पळापळ सुरू झाली होती. माहिती मिळताच बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (BDDS) घटनास्थळी धाव घेतली. तपासणीत त्या वस्तूमध्ये जिलेटिनच्या कांड्या असल्याचे निष्पन्न झाले. कोणत्याही क्षणी मोठा अनर्थ घडू शकला असता, मात्र पोलिसांनी अत्यंत कौशल्याने त्या कांड्या सुरक्षित जागी हलवून निकामी केल्या आणि पुण्याचा श्वास मोकळा झाला.
एटीएस आणि पोलिसांचा संयुक्त तपास
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून स्थानिक पोलिसांसह दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) तपास सुरू केला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताची कसून चौकशी केली जात असून, आरोपीने जिलेटिनच्या कांड्या नेमक्या कुठून मिळवल्या? रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये या वस्तू ठेवण्यामागे त्याचा हेतू काय होता? यामागे काही वैयक्तिक वैमनस्य आहे की घातपाताचा कट? या सर्व प्रश्नांची चौकशी सध्या सुरू आहे.
हेही वाचा – NEET Paper Leak Case: मोठी बातमी! NEET पेपर फुटी प्रकरणात आणखी एक संशयित ताब्यात
'आरोग्य' कनेक्शनमुळे खळबळ
रुग्णसेवा देणाऱ्या विभागातील व्यक्तीनेच अशा प्रकारचे कृत्य केल्याचा संशय असल्याने तपासाची व्याप्ती वाढली आहे. आरोपी आरोग्य विभागात कोणत्या पदावर कार्यरत आहे आणि त्याचे रुग्णालयाशी काही संबंध होते का, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून रुग्णालय परिसरातील भीतीचे वातावरण आता निवळले आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.