US Attack on Aeroplan : मध्यपूर्वेतील संघर्ष आता टोकाच्या टप्प्यावर पोहोचला असून, अमेरिकेने इराणच्या मशहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हवाई हल्ल्यात एका नागरी विमानाचा चक्काचूर झाला आहे. विशेष म्हणजे, हे विमान भारतातून वैद्यकीय मदत नेण्यासाठी दिल्लीला रवाना होणार होते. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली असून मानवी मदतीवर झालेल्या या हल्ल्याचा तीव्र निषेध केला जात आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन वायुसेनेने इराणमधील मशहद विमानतळाला लक्ष्य केले. या हल्ल्याच्या वेळी धावपट्टीवर उभे असलेले 'महान एअर' कंपनीचे एक विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. हे विमान युद्धग्रस्तांसाठी दिल्लीतून 11 टनांहून अधिक औषधे आणि जीवनावश्यक साहित्याची मदत नेण्यासाठी येणार होते. भारतीय नागरिकांनी इराणी जनतेसाठी जमा केलेली मानवी मदत या विमानातून इराणला नेली जाणार होती. मात्र, उड्डाणापूर्वीच हे विमान अमेरिकन क्षेपणास्त्राचे शिकार ठरले.
इस्रायलचा तेहरानवर जबरदस्त प्रहार
एकीकडे अमेरिका विमानतळांना लक्ष्य करत असताना, दुसरीकडे इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर हल्ल्यांचा पाऊस पाडला आहे. सोमवारी सकाळी इस्रायलने तेहरानमधील प्रमुख लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याचे अधिकृतपणे मान्य केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच युद्धविराम होण्याची शक्यता वर्तवली असली, तरी प्रत्यक्ष जमिनीवर मात्र अमेरिका आणि इस्रायलने इराणची कोंडी करण्यासाठी हल्ले तीव्र केले आहेत.
जागतिक व्यापारावर टांगती तलवार
गेल्या पाच आठवड्यांपासून सुरू असलेल्या या युद्धामुळे केवळ मध्यपूर्वच नव्हे, तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. भारताकडे येणाऱ्या मदत विमानावर झालेल्या या हल्ल्यामुळे इराणने संताप व्यक्त केला असून, याला 'मानवतावादी साहाय्यावर केलेला हल्ला' असे संबोधले आहे. आता इराणकडून दुसरे विमान पाठवण्याची तयारी सुरू असली, तरी सततच्या बॉम्बफेकीमुळे मदत कार्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत.