Durga Ashtami 2026 Date: सनातन धर्मात चैत्र नवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व असून, या नऊ दिवसांत आदिशक्ती देवी दुर्गेची मनोभावे उपासना केली जाते. नवरात्रीचा आठवा दिवस म्हणजेच 'दुर्गा अष्टमी' हा भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. अनेक भाविक या दिवशी 'अखंड ज्योत' विसर्जित करतात आणि कन्या पूजन करून आपला उपवास सोडतात. सन 2026 मध्ये दुर्गा अष्टमी कोणत्या तारखेला आहे आणि पूजेचा शुभ मुहूर्त काय, याबाबत भाविकांमध्ये संभ्रम आहे. पंचांगानुसार, यंदा दुर्गा अष्टमी 26 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे.
तारीख आणि तिथीची वेळ
'दृक पंचांग'नुसार, चैत्र नवरात्रीची सुरुवात 19 मार्च 2026 पासून होत आहे. अष्टमी तिथीचा प्रारंभ 25 मार्च रोजी दुपारी 1:50 वाजता होईल आणि ही तिथी 26 मार्च 2026 रोजी सकाळी 11:48 वाजेपर्यंत असेल. 'उदयातिथी'च्या शास्त्रोक्त नियमानुसार, गुरुवारी 26 मार्च रोजीच दुर्गा अष्टमीचा उपवास आणि पूजन करणे फलदायी ठरेल. या दिवशी देवीच्या 'महागौरी' रूपाची पूजा केली जाते, ज्यामुळे वैवाहिक सुख आणि आर्थिक समृद्धी लाभते अशी भाविकांची श्रद्धा आहे.
दुर्गा अष्टमी पूजनाचे शुभ मुहूर्त
अष्टमीच्या दिवशी देवीची आराधना करण्यासाठी खालील शुभ वेळा पाळणे श्रेयस्कर ठरेल:
सूर्योदय: सकाळी 06:49 वाजता
ब्रह्म मुहूर्त: पहाटे 05:17 ते 06:03 पर्यंत
अभिजीत मुहूर्त: दुपारी 12:37 ते 01:27 पर्यंत
सूर्यास्त: सायंकाळी 07:15 वाजता
सायंकालीन संध्या: सायंकाळी 07:15 ते रात्री 08:24 पर्यंत
हेही वाचा – Ram Navami 2026: राम नवमी नेमकी कधी? तिथीमुळे भाविकांमध्ये संभ्रम; जाणून घ्या अचूक मुहूर्त अन् तारीख
कन्या पूजनाचे वेळापत्रक
कुमारीकांना देवी दुर्गेचे साक्षात रूप मानले जाते, त्यामुळे अष्टमीला कन्या पूजनाला विशेष महत्त्व आहे. यावर्षी 26 मार्च रोजी कन्या पूजनासाठी सकाळी 06:49 ते 11:48 पर्यंतचा काळ अत्यंत शुभ आहे. जर काही कारणास्तव या वेळेत पूजन करणे शक्य झाले नाही, तर सकाळी 11:24 ते दुपारी 12:12 या पर्यायी वेळेतही हा विधी पूर्ण करता येईल. कन्या पूजनामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते, असे मानले जाते.