Dasakhed Phata Accident: बीड जिल्ह्यात उशिरा रात्री झालेल्या एका गंभीर अपघाताने वातावरण ढवळून निघाले आहे. पाटोदा तालुक्यातील दासखेड फाटा परिसरात चारचाकी वाहनाने वेगात येत दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात महाजनवाडीचे रहिवासी आणि मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे अतुल घरत यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर चालक फरार; गाडीतील वस्तूंमुळे संशय वाढला
धडक दिल्यानंतर चारचाकीचा चालक घटनास्थळावरून पळून गेला. स्थानिकांनी वाहनाची पाहणी करताच काही धक्कादायक गोष्टी समोर आल्याचे सांगितले जाते. गाडीवर ‘आण्णा’ असा मजकूर लिहिलेला असून, वाहनाच्या आत पोलिसांची वर्दी आढळल्याचेही बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर हा प्रकार केवळ अपघात नसून ठरवून केलेला हल्ला असावा, अशी चर्चा सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे.
हेही वाचा – Pune Leopard Attack: भीतीचं सावट ! शाळकरी मुलावर बिबट्याचा हल्ला, प्रतिकार केला पण…
अपघात की घातपात?
दरम्यान, अतुल घरत पाटोदा येथून आपल्या गावी परत जात असताना ही घटना घडली. त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे आणि मनोज जरांगे यांच्याशी असलेल्या निष्ठेमुळे या मृत्यूमागे कटकारस्थान असू शकते, असा तर्क व्यक्त केला जात आहे. काहींच्या मते संशयाची सुई वाल्मीक ‘आण्णा’ कराड यांच्याकडे वळते आहे. कारण मनोज जरांगे यांनी अलीकडे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणावरून कराड यांच्यावर तीव्र टीका केली होती. त्यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे. मात्र, या अपघाताशी कराड यांचा कोणताही थेट संबंध असल्याचे अद्याप कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत.
पोलिसांचा तपास सुरू
घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून, अपघाताचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चालक फरार असल्याने प्रकरणातील खरी सत्यता अद्याप धूसर आहे. हा अपघात होता की नियोजित घातपात, हे चालकाच्या अटकेनंतरच स्पष्ट होणार आहे. या घटनेने बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.