शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना थेट आणि पारदर्शक पद्धतीने लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने अंमलबजावणीला वेग दिला आहे. योजनेअंतर्गत निधीचे वितरण सुलभ, सुरक्षित आणि वेळेत होण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विशेष 'पूल बँक खाती' उघडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या खात्यांद्वारे शासनाकडून वितरित होणारा निधी थेट पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शासनाने या विशेष खात्यांच्या वापराबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर ही 'पूल बँक खाती' तातडीने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे निधीच्या वापरात पारदर्शकता राहण्यास, आर्थिक व्यवहारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास आणि निधीचा गैरवापर टाळण्यास मदत होणार आहे. तसेच, पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, हे खाते बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुंबई येथील 'गव्हर्मेंट बिझनेस ब्रँच'मध्ये उघडण्यात येणार असून 'सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे' या नावाने हे विशेष पूल बँक खाते सुरु केले जाईल. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ वेळेत आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळावा, यासाठी राज्य सरकारने या योजनेसाठी कडक कार्यपद्धती निश्चित केली आहे. शासनाकडून विशेष 'पूल बँक खात्यात' निधी जमा झाल्यानंतर तो निधी 24तासांच्या आत पात्र शेतकऱ्यांच्या वैयक्तिक कर्ज खात्यात वर्ग करणे संबंधित बँकेसाठी बंधनकारक करण्यात आले आहे.
या योजनेची संपूर्ण अंमलबजावणी महाआयटी (MahaIT) विकसित केलेल्या ऑनलाइन प्रणालीद्वारे केली जाणार असून, लाभार्थी पडताळणी, निधी वितरण आणि व्यवहारांचे निरीक्षण या सर्व प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पार पडतील. थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीचा अवलंब केल्यामुळे निधी योग्य लाभार्थ्यांच्या खात्यात सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचेल. त्यामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक विश्वासार्हता निर्माण होण्यासोबतच योजनेची प्रभावी आणि वेळेत अंमलबजावणी होण्यासही मदत होणार आहे.
राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, या विशेष 'पूल बँक खात्याचा' वापर केवळ 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत निधी वितरणासाठीच केला जाणार आहे. या खात्याद्वारे अन्य कोणताही शासकीय किंवा खासगी आर्थिक व्यवहार करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत शेवटचा निधी हस्तांतरण व्यवहार पूर्ण होताच आणि सर्व पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये लाभ जमा झाल्यानंतर हे विशेष खाते तात्काळ बंद करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. यामुळे निधीचा वापर केवळ निर्धारित उद्देशासाठीच होईल आणि आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता व उत्तरदायित्व कायम राहील.