TET Paper Leak Case: महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणामुळे आज होणारी परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. या खळबळजनक प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याचे सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि पोलीस महासंचालक (DGP) सदानंद दाते यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कडक कारवाईचे निर्देश दिले. दरम्यान, भिवंडी पोलिसांनी अटक केलेल्या 3 आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हे आरोपी दिल्लीहून भिवंडीत पेपर विकण्यासाठी आले होते, मात्र त्यापूर्वीच त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या.
1.5 कोटी रुपयांचा झाला होता व्यवहार; आंतरराष्ट्रीय टोळीचा संशय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून TET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे 4 संच जप्त करण्यात आले आहेत. हा पेपर विकण्यासाठी तब्बल 1.5 कोटी रुपयांचा व्यवहार निश्चित झाला होता, परंतु विक्री पूर्ण होण्याआधीच पोलिसांनी त्यांचा डाव हाणून पाडला. या गैरव्यवहारात आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याचा प्राथमिक संशय महाराष्ट्र पोलिसांना असून, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि इतर 2 आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस सध्या त्यांचा कसून शोध घेत आहेत.
4.28 लाख उमेदवारांमध्ये निराशा
या परीक्षा घोटाळ्यामुळे राज्यभरातील 4.28 लाख उमेदवारांना मोठा फटका बसला असून त्यांच्यात प्रचंड निराशेचे वातावरण आहे. यावर महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेने तीव्र संताप व्यक्त करत, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची आणि उमेदवारांचे नुकसान टाळण्यासाठी येत्या 1 महिन्यात ही परीक्षा पुन्हा आयोजित करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
पेपरफुटीवरून राजकीय वातावरण तापले; राहुल गांधींचा महायुती सरकारवर निशाणा
TET परीक्षा रद्द झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत म्हटले की, देशातील शिक्षण आणि परीक्षा व्यवस्था आता केवळ खंडणी उकळण्याचा धंदा बनली आहे. ही केवळ प्रश्नपत्रिका फुटण्याची घटना नसून तरुणांच्या भविष्याची लूट आहे, असा घणाघात त्यांनी केला. दुसरीकडे, शिवसेना नेते संजय निरुपम यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच आरोपींना पकडल्याबद्दल सरकारचे कौतुक केले. तसेच कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या अशा माफियांचा बिमोड करण्यासाठी दिल्लीपासून मुंबईपर्यंत कडक कायदे करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.