Nida Khan: नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्याचे लैंगिक शोषण आणि सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याच्या खळबळजनक प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला नाशिकरोड न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. निदा खानची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज तिला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने तिची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
न्यायालयीन कामकाजातील महत्त्वाचे मुद्दे
दरम्यान, निदा खान गरोदर असल्याने तिला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले जाण्याची शक्यता होती, मात्र कडेकोट पोलीस बंदोबस्तात तिला प्रत्यक्ष न्यायालयात आणले गेले. पाच दिवसांच्या चौकशीनंतर पोलिसांनी निदाच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली नाही. गरोदरपणामुळे मानवतावादी दृष्टिकोनातून पोलिसांनी कोठडी मागणे टाळल्याचे समजते. आता निदा खानची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात येणार आहे.
पोलीस तपासातील धक्कादायक खुलासे
निदा खानच्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत अनेक खळबळजनक माहिती समोर आली आहे:
धार्मिक दबाव: निदा खान पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी करत असे. तिला विशिष्ट धर्माची प्रार्थना आणि पोशाख परिधान करण्यासाठी प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले आहे.
171 डिजिटल लिंकचा पुरावा: पीडितेचे मतपरिवर्तन करण्यासाठी तिला धार्मिक आशयाच्या तब्बल 171 लिंक्स पाठवण्यात आल्या होत्या. या लिंक्सचा स्रोत आणि त्यामागील सूत्रधार कोण, याचा शोध आता सायबर पोलीस करत आहेत.
कुटुंबीयांची चौकशी: पोलीस कोठडीदरम्यान निदासह तिच्या कुटुंबातील सदस्यांचीही कसून चौकशी करण्यात आली आहे.
हेही वाचा – Yavatmal Crime: बॉयफ्रेंडच्या प्रेमात महिला इतकी आंधळी झाली की, नवऱ्यालाच संपवण्याचा रचला कट; अखेर…
इतर आरोपींच्या नशिबाचा फैसला आजच
मुख्य आरोपी निदा खानची रवानगी जेलमध्ये झाली असली, तरी या प्रकरणातील इतर संशयितांनी जामिनासाठी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार असून, न्यायालय त्यांना जामीन देणार की त्यांचीही रवानगी कोठडीत होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.