Nandurbar School Bus Accident: नंदुरबार जिल्ह्यातील देवगोई घाट परिसरात रविवारी सकाळी भीषण अपघात घडला आहे. शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक स्कूल बस तब्बल 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या भीषण दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून, इतर अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळावर पोलीस व प्रशासनाचे पथक दाखल झाले असून, स्थानिक नागरिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले आहे. बचाव पथक जखमी विद्यार्थ्यांना दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहे.
प्राप्त माहितीनुसार, सातपुडा पर्वताच्या दुर्गम भागातील विद्यार्थी दररोज नंदुरबार शहरातील शाळेत जाण्यासाठी या बसचा वापर करत असतात. सोमवारी शाळा सुरू होत असल्याने बस विद्यार्थ्यांना शाळेकडे घेऊन जात असताना हा अपघात झाला. देवगोई घाटात अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
हेही वाचा – Matoshree Drone News: ‘ठाकरेंवर लक्ष ठेवलं जातंय? मातोश्रीभोवती ड्रोनच्या घिरट्या; पोलिसांचा खुलासा
दरम्यान, घटनास्थळी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून, जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात येत आहे. प्रशासनाकडून घटनास्थळी क्रेन आणि वैद्यकीय पथक पाठवण्यात आले आहे. या अपघातामुळे सातपुडा परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्थानिक नागरिकांनी अनेकदा खराब रस्त्यांबाबत तक्रारी केल्या होत्या, मात्र सुधारणा न झाल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
याशिवाय, या दुर्घटनेनंतर पालक आणि स्थानिक नागरिक शाळा प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. तथापी, बसमध्ये मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवले जातात आणि सुरक्षा उपाययोजना न पाळल्याचा आरोप करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील या भीषण अपघातानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.