Palghar Urea Scam: पालघर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खतावर डल्ला मारणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, अनुदानित युरियाचा औद्योगिक वापरासाठी काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा बोईसर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शेतीसाठी सवलतीच्या दरात मिळणाऱ्या खताचा गैरवापर करून तो कारखान्यांकडे वळवणाऱ्या या टोळीमध्ये चक्क राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली असून, कष्टकरी शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गस्तीदरम्यान संशयास्पद टेम्पोची झडती
ही कारवाई 25 मार्च रोजी तारापूर MIDC परिसरात करण्यात आली. बोईसर पोलीस गस्तीवर असताना त्यांना एक संशयास्पद टेम्पो आढळून आला. पोलिसांनी टेम्पो थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये 50 किलो वजनाच्या तब्बल 226 गोण्या युरिया खत आढळून आले. विशेष म्हणजे, या गोण्यांवर ‘औद्योगिक वापरासाठी’ असा उल्लेख होता; मात्र त्याबाबतची कोणतीही वैध कागदपत्रे चालकाकडे नव्हती. पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी सखोल चौकशी केली आणि या मोठ्या रॅकेटचा उलगडा झाला.
नाशिक कनेक्शन आणि अटक सत्र
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 20 लाखांच्या मुद्देमालासह 4 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील एका मोठ्या वितरकासह बोईसरमधील एका स्थानिक व्यक्तीचा समावेश आहे. तपासादरम्यान असे समोर आले की, शेतीसाठी येणारा अनुदानित युरिया कमी किमतीत खरेदी करून तो अधिक नफ्यासाठी औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांना विकला जात होता. या रॅकेटची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खताची मोठी गरज असते. अशा वेळी राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्तींकडूनच खताची अशी पळवापळवी होत असल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. “एकीकडे शेतकरी खतासाठी रांगेत उभा राहतो आणि दुसरीकडे आमचेच खत कारखान्यांमध्ये विकले जाते, हे दुर्दैव आहे,” अशी भावना स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. बोईसर पोलीस आता या प्रकरणात आणखी कोणाचे हात गुंतले आहेत, याचा अधिक तपास करत आहेत.