IPS Transferred: राज्य सरकारने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी पोलीस प्रशासनात मोठी खांदेपालट केली होती. आता गृह विभागाने आज जारी केलेल्या नवीन आदेशानुसार, राज्यातील 24 वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पोलीस सहआयुक्त, अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असून, फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
या बदल्यांमध्ये 'फोर्स वन'चे अपर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांची आता अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण) या पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांची राज्य मानवी हक्क आयोगात बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी प्रविण पडवळ यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई आणि पुण्याच्या पोलीस दलातही महत्त्वाचे बदल झाले आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (Anti-Narcotics Cell) प्रमुखपदी ज्योती प्रिया सिंग यांची वर्णी लागली असून, दिपक साकोरे यांची पदोन्नतीने नवी मुंबईच्या सह-पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबई पोलीस दलातही महत्त्वपूर्ण बदल झाले असून, लखमी गौतम यांची विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) पदी रवानगी झाली आहे. त्यांच्या जागी मनोज शर्मा यांची नियुक्ती पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), मुंबई म्हणून करण्यात आली आहे. तसेच, सुवेझ हक यांच्याकडे पोलीस सह आयुक्त (प्रशासन), मुंबई ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या महत्त्वाच्या पदी अनिल कुंभारे यांची पोलीस सह आयुक्त (गुन्हे), मुंबई म्हणून नियुक्ती झाली असून, परमजीत दहिया यांची पदोन्नतीने विशेष पोलीस महानिरीक्षक, एटीएस (ATS) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त, सत्य नारायण चौधरी यांच्याकडे मुंबई वाहतूक शाखेच्या सह-पोलीस आयुक्तपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. जय कुमार यांची 'फोर्स वन'च्या प्रमुखपदी तर रंजन शर्मा यांची कोल्हापूर परिक्षेत्राच्या आयजी पदी रवानगी झाली आहे. ठाणे आणि नवी मुंबईतील वरिष्ठ पदांवरही नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव आणि पदोन्नतीच्या नियमांनुसार हे मोठे बदल करण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.