Raghav Chadha Join BJP: आम आदमी पक्षात (AAP) सध्या राजकीय भूकंपाची स्थिती निर्माण झाली असून पक्षात मोठे बंड उभे राहिले आहे. राज्यसभेचे दिग्गज खासदार राघव चढ्ढा यांच्यासह तीन प्रमुख खासदारांनी ‘आप’ला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करण्याचा खळबळजनक निर्णय घेतला आहे. राघव चढ्ढा यांच्यासोबत अशोक मित्तल आणि संदीप पाठक या खासदारांनीही अधिकृतपणे भाजपचे कमळ हाती घेतले असून, या घडामोडीमुळे दिल्लीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
केजरीवाल यांच्या विश्वासू सहकाऱ्यांचा राजीनामा
पक्ष सोडल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत तिन्ही खासदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. संदीप पाठक यांनी यावेळी अत्यंत भावनिक उद्गार काढले. ते म्हणाले, “मी कधीच स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचा प्रयत्न केला नाही, तर नेहमीच पक्षाला आणि अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च प्राधान्य दिले. माझ्याप्रमाणेच देशातील लाखो कार्यकर्ते स्वतःपेक्षा पक्षाला श्रेष्ठ मानतात.” असे असतानाही पक्ष सोडण्याची वेळ का आली, याबाबत त्यांनी सूचक भाष्य केले.
दोन-तृतीयांश बहुमतासह भाजपमध्ये विलीनीकरण
या बंडाचे नेतृत्व करणाऱ्या राघव चढ्ढा यांनी तांत्रिक आणि कायदेशीर बाजू स्पष्ट केली. ते म्हणाले, “राज्यसभेतील आम आदमी पक्षाच्या एकूण सदस्यांपैकी दोन-तृतीयांश सदस्य आमच्या सोबत आहेत. त्यामुळे आम्ही भारतीय संविधानातील तरतुदींचा वापर करून भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे.” या निर्णयामुळे तांत्रिकदृष्ट्या त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार राहण्याची शक्यता कमी असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार
राघव चढ्ढा (पंजाब)
संदीप पाठक (पंजाब)
संजय सिंग (दिल्ली)
अशोक कुमार मित्तल (पंजाब)
हरभजन सिंग (पंजाब)
विक्रमजीत सिंग साहनी (पंजाब)
बलबीर सिंग सीचेवाल (पंजाब)
स्वाती मालीवाल (दिल्ली)
एन.डी. गुप्ता (दिल्ली)
संजीव अरोरा (पंजाब)
राघवच्या म्हणण्यानुसार खालील खासदार त्याच्यासोबत आहेत
विक्रमजितसिंग साहनी
राजेंद्र गुप्ता
स्वाती मालीवाल
संदीप पाठक
राघव चढ्ढा
हरभजन सिंग
अशोक मित्तल
#WATCH | 2/3rd MPs of AAP in Rajya Sabha announce merging with the BJP. AAP MP Raghav Chadha says, "There are 10 AAP MPs in the Rajya Sabha, more than 2/3rd of them are with us in this. They have signed and this morning we submitted the signed letter and documents to the Rajya… pic.twitter.com/mn4kuYs2ht — ANI (@ANI) April 24, 2026
आणखी बड्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचा दावा
या बंडाची व्याप्ती केवळ या तीन खासदारांपुरती मर्यादित नसून, पक्षाचे इतरही मोठे चेहरे त्यांच्यासोबत असल्याचे चढ्ढा यांनी स्पष्ट केले. यामध्ये हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, विक्रमजित सिंग साहनी आणि स्वाती मालीवाल या खासदारांचाही पाठिंबा असल्याचा दावा राघव चढ्ढा यांनी केला आहे. पक्षात पडलेल्या या उभ्या फुटीमुळे आम आदमी पक्षाच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले असून, आगामी काळात पक्षाला हे खिंडार रोखण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे.