Loan EMI Increase: तुम्ही एचडीएफसी (HDFC) बँकेकडून गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज घेतले असेल, तर आता तुमच्या खिशावरील भार वाढणार आहे. देशातील आघाडीच्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या एचडीएफसी बँकेने आपल्या कर्जदरांशी संबंधित 'एमसीएलआर' (MCLR – Marginal Cost of Funds Based Lending Rate) मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नवीन कर्जदारांना अधिक व्याज द्यावे लागणार असून, विद्यमान ग्राहकांच्या कर्जाचा रीसेट कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या मासिक हप्त्यांमध्ये (EMI) वाढ होणार आहे. विशेष म्हणजे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नुकत्याच झालेल्या पतधोरण बैठकीत रेपो दर 5.25 टक्क्यांवर कायम ठेवला असतानाही एचडीएफसी बँकेने कर्जदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
5 ते 10 बेसिस पॉइंट्सची वाढ; सुधारित दर लागू
एचडीएफसी बँकेने विविध कालावधीच्या कर्जांसाठी एमसीएलआर दरांमध्ये 5 ते 10 बेसिस पॉइंट्सपर्यंत वाढ केली आहे. या बदलांनंतर बँकेचे सुधारित कर्जदर 8.05 टक्क्यांपासून 8.65 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहेत. एक दिवसाच्या (Overnight) कर्जावरील दर 8.05 टक्क्यांवरून 8.10 टक्के करण्यात आला आहे. 3 महिन्यांच्या कर्जासाठी दर 8.15 टक्क्यांवरून 8.20 टक्के, तर 6 महिन्यांच्या कर्जासाठी 8.30 टक्क्यांवरून 8.35 टक्के करण्यात आला आहे. 1 वर्षांच्या कर्जावरील दर 8.35 टक्क्यांवरून 8.40 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. 2 वर्षांच्या कर्जासाठी सर्वाधिक 10 बेसिस पॉइंट्सची वाढ करत तो 8.45 टक्क्यांवरून 8.55 टक्के करण्यात आला आहे. तसेच 3 वर्षांच्या कर्जावरील व्याजदर 8.60 टक्क्यांवरून 8.65 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, 1 महिन्याच्या कालावधीचा एमसीएलआर दर 8.05 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.
EMI वर किती परिणाम होणार?
या दरवाढीचा ग्राहकांच्या मासिक हप्त्यांवर थेट परिणाम होणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या ग्राहकाने 2 वर्षांच्या कालावधीसाठी 1,00,000 रुपयांचे कर्ज घेतले असल्यास, पूर्वी 8.45 टक्के व्याजदरानुसार त्याचा मासिक EMI 4,543 रुपये होता. आता व्याजदर 8.55 टक्के झाल्याने हा हप्ता वाढून 4,548 रुपये होणार आहे. ही वाढ किरकोळ वाटत असली तरी मोठ्या कर्जरकमेवर तिचा परिणाम अधिक जाणवू शकतो.
रीसेट कालावधीनंतरच वाढीव हप्ता लागू
एमसीएलआरशी जोडलेल्या फ्लोटिंग व्याजदराच्या कर्जांवर या वाढीचा परिणाम होणार आहे. मात्र, हा बदल तात्काळ लागू होणार नाही. प्रत्येक कर्जाचा एक निश्चित रीसेट कालावधी असतो. हा कालावधी 6 महिने किंवा 1 वर्षांचा असू शकतो. संबंधित कालावधी पूर्ण झाल्यानंतरच ग्राहकांना वाढीव व्याजदर आणि नवीन EMI लागू होईल. एमसीएलआर हा बँकेचा किमान कर्जदर असून, त्याखाली कर्ज देण्याची परवानगी बँकांना नसते. हा दर निश्चित करताना निधी उभारणीचा खर्च आणि बँकेचा अंतर्गत परिचालन खर्च विचारात घेतला जातो.
FD गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी
कर्जदारांसाठी ही बातमी धक्कादायक असली, तरी मुदत ठेव (FD) गुंतवणूकदारांसाठी मात्र ती दिलासादायक ठरू शकते. कर्जदर वाढल्यामुळे आगामी काळात मुदत ठेवींवरील व्याजदरही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या एचडीएफसी बँक सर्वसामान्य नागरिकांना वार्षिक 2.75 टक्के ते 6.50 टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांना 3.25 टक्के ते 7 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. त्यामुळे भविष्यात एफडीवरील परतावा आणखी आकर्षक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.