Twisha Sharma Death Case: मध्य प्रदेशातील भोपाळ येथे झालेल्या ट्विशा शर्माच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले आहे. या खटल्यातील मुख्य आरोपी आणि ट्विशाचा पती समर्थ सिंग हा शुक्रवारी जबलपूर जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात शरणागती पत्करण्यासाठी दाखल झाला. ट्विशाचा मृत्यू झाल्यापासून, म्हणजेच 12 मे च्या रात्रीपासूनच समर्थ सिंग फरार होता. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध 'लुकआउट नोटीस' जारी केली होती, तसेच त्याला पकडणाऱ्यास 30,000 रुपयांचे बक्षीस देखील जाहीर केले होते. दरम्यान, समर्थने यापूर्वी दाखल केलेली आपली अटकपूर्व जामिनाची याचिकाही मागे घेतली होती.
जबलपूर न्यायालयाचे निर्देश; भोपाळचे 'कटारा हिल्स' पोलीस करणार चौकशी
जबलपूर जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांनी समर्थ सिंगची याचिका पाहता त्याला जबलपूरऐवजी थेट भोपाळमध्येच शरणागती पत्करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशानंतर आता समर्थ सिंगला भोपाळ न्यायालयासमोरच हजर व्हावे लागणार आहे. त्याने भोपाळ न्यायालयात सरेंडर केल्यानंतर, तिथले 'कटारा हिल्स' पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात त्याची कस्टडी घेऊन कसून चौकशी करतील. समर्थ सिंगच्या चौकशीतून ट्विशा शर्माच्या मृत्यूच्या मूळ कारणांबाबत अनेक मोठे आणि नवीन खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सहआरोपी गिरीबाला सिंग यांना मोठा धक्का; वकिलाने खटल्यातून घेतली माघार
ट्विशा शर्मा प्रकरणात दुसरीकडे एक मोठी कायदेशीर घडामोड घडली आहे. समर्थ सिंगची आई आणि या प्रकरणातील सहआरोपी गिरीबाला सिंग यांना बचावाच्या पातळीवर मोठा धक्का बसला आहे. या खटल्याला गुरुवारी अत्यंत नाट्यमय वळण मिळाले, जेव्हा गिरीबाला सिंग यांचे वकील 'इनोश जॉर्ज कार्लो' यांनी अचानक या खटल्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गिरीबाला सिंग यांचे कायदेशीर प्रतिनिधित्व ऐन मध्यधुरीत सोडून दिले आहे. खटला अत्यंत नाजूक आणि महत्त्वाच्या टप्प्यावर आलेला असताना वकिलाने अचानक घेतलेली ही माघार आरोपीच्या बचावासाठी कायदेशीरदृष्ट्या मोठा फटका मानली जात आहे.
उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; दिल्ली AIIMS चे पथक विशेष विमानाने भोपाळला येणार
या संपूर्ण प्रकरणात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने नोएडा येथील रहिवासी असलेल्या ट्विशा शर्माच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने ट्विशाच्या मृतदेहाचे दुसऱ्यांदा शवविच्छेदन (Post-mortem) करण्याचे ऐतिहासिक आदेश जारी केले आहेत. अवघ्या काही दिवसांपूर्वीच भोपाळमधील एका कनिष्ठ न्यायालयाने पीडितेच्या कुटुंबीयांची ही मागणी फेटाळून लावली होती. कुटुंबीयांचा आरोप आहे की, हे केवळ आत्महत्येचे साधे प्रकरण नसून त्यामागे मोठा कट आहे. ही याचिका मान्य करत न्यायमूर्ती अवनींद्र कुमार सिंह यांनी दिल्लीच्या 'एम्स' (AIIMS) मधील डॉक्टरांच्या एका विशेष पथकामार्फत दुसरे पोस्ट-मॉर्टम करण्याचे निर्देश दिले. हे तज्ज्ञ डॉक्टर दिल्लीहून भोपाळला एका विशेष विमानाने येतील आणि ही प्रक्रिया त्वरित पूर्ण केली जाईल.