Ration Card Rules: राज्यातील शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत मिळणाऱ्या स्वस्त धान्याच्या वाटप पद्धतीत पुन्हा एकदा सुधारणा करण्यात येणार आहे. अंत्योदय अन्न योजना तसेच प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या तांदूळ आणि गहू यांच्या प्रमाणात जानेवारी 2026 पासून बदल लागू करण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील कोट्यवधी लाभार्थ्यांच्या मासिक धान्यपुरवठ्यावर थेट परिणाम होणार आहे.
नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, जानेवारी 2026 पासून अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना दरमहा एकूण 35 किलो धान्य दिले जाणार आहे. यामध्ये 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू यांचा समावेश असेल. तर प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना प्रति सदस्य दरमहा 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू देण्यात येणार आहेत. हे वितरण राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात नमूद केलेल्या मूळ तरतुदींनुसार करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
याआधी काही काळासाठी धान्य वितरणाच्या प्रमाणात तात्पुरते बदल करण्यात आले होते. त्यावेळी अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू देण्यात येत होते, तर प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 4 किलो तांदूळ आणि 1 किलो गहू दिला जात होता. या व्यवस्थेमुळे तांदळाचे प्रमाण वाढले असले, तरी गव्हाचे प्रमाण घटल्याने अनेक भागांत लाभार्थ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. काही ठिकाणी तांदळाची मागणी अधिक असल्याने समाधान दिसून आले, मात्र गहू कमी मिळाल्यामुळे अनेक कुटुंबांच्या दैनंदिन गरजांवर परिणाम झाल्याचे चित्र होते. या सर्व बाबींचा विचार करून सरकारने पुन्हा एकदा मूळ वितरण पद्धतीकडे परतण्याचा निर्णय घेतला आहे. पुरवठा विभागाच्या माहितीनुसार, डिसेंबर 2025 पर्यंत सध्या सुरू असलेलेच धान्य वाटपाचे प्रमाण लागू राहणार आहे. त्यामुळे त्या महिन्यात लाभार्थ्यांना मिळणाऱ्या धान्यात कोणताही बदल होणार नाही. मात्र, जानेवारी 2026 पासून नव्याने निश्चित केलेले प्रमाण संपूर्ण राज्यात अंमलात आणले जाईल.
हेही वाचा – Pradnya Satav: हिंगोलीच्या राजकारणात खळबळ! काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर
रास्त दर दुकानांवर होणाऱ्या वितरणासाठी आवश्यक नियोजन करण्यात येणार असून, शिधापत्रिकाधारकांनी आपल्या कार्डवरील सदस्यसंख्या तसेच मासिक मिळणाऱ्या धान्याच्या तपशीलाची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गरीब, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची असल्याने, धान्य वाटपातील हा बदल त्यांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणारा ठरणार आहे. जानेवारी 2026 पासून लागू होणाऱ्या नव्या व्यवस्थेमुळे तांदूळ आणि गहू यातील संतुलन पुन्हा प्रस्थापित होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.