Railways Ticket Refund Rules: तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि सामान्य प्रवाशांना आरक्षणाची सुविधा सुलभ करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तिकीट परतावा (Refund) नियमांमध्ये अत्यंत कडक बदल लागू केले आहेत. नवीन नियमांनुसार, तिकीट रद्द करण्याच्या वेळेवर आता परताव्याची रक्कम अवलंबून असेल. जर एखाद्या प्रवाशाने गाडी सुटण्याच्या नियोजित वेळेच्या 8 तासांच्या आत तिकीट रद्द केले, तर त्यांना कोणताही परतावा दिला जाणार नाही. या निर्णयामुळे ऐनवेळी तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
परताव्याचे नवे गणित
रेल्वेने जाहीर केलेल्या नवीन तरतुदीनुसार, जर तिकीट गाडी सुटण्याच्या 24 तास ते 8 तास आधी रद्द केले, तर प्रवाशांना तिकिटाच्या मूळ भाड्यापैकी केवळ 50 टक्के रक्कम परत मिळेल. तसेच, जर तिकीट 72 तास आधी रद्द केले, तरच प्रवासी 75 टक्के पर्यंत परतावा मिळवण्यास पात्र असतील. यापूर्वी 72 तास किंवा त्यापेक्षा जास्त काळ आधी तिकीट रद्द केल्यास जवळपास पूर्ण परतावा मिळत असे. मात्र, दलाल आणि काळाबाजार करणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.
आता कोणत्याही स्थानकावर तिकीट रद्द करण्याची सोय
एकीकडे परताव्याचे नियम कडक केले असतानाच, रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी काही महत्त्वाचे बदलही केले आहेत. आता प्रवासी आपले 'ऑफलाइन' तिकीट कोणत्याही रेल्वे स्थानकावर जाऊन रद्द करू शकतात. यासाठी ज्या स्थानकावरून तिकीट आरक्षित केले होते, तिथेच जाण्याची अट आता रद्द करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत.
बोर्डिंग स्टेशन आणि श्रेणी बदलणे झाले सोपे
प्रवाशांना अधिक लवचिकता देण्यासाठी रेल्वेने मोबाईल ॲपमध्ये 'बोर्डिंग स्टेशन' अद्ययावत करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आता प्रवासी मूळ स्थानकाऐवजी मार्गावरील कोणत्याही पुढील स्थानकावरून गाडीत चढू शकतील. याशिवाय, प्रवाशांना आता त्यांच्या आसनाच्या पसंतीमध्ये (Seat preferences) बदल करण्याची मुभा असेल. गाडी सुटण्याच्या 30 मिनिटे आधीपर्यंत डबा (Coach) आणि श्रेणी (Class) बदलण्याचा पर्याय उपलब्ध असेल. उदाहरणार्थ, प्रवासी 3-Tier AC मधून 1-Tier AC मध्ये आपले तिकीट अपग्रेड करू शकतील. प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर आणि पारदर्शक करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.