FDA Raid: अन्न व औषध प्रशासनाचा दूध माफियांना मोठा झटका; तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली 43 लाखांचा माल जप्त

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या थेट आदेशानुसार राज्यात 2 दिवसांची विशेष मोहीम राबवण्यात आली.

FDA Raid: अन्न व औषध प्रशासनाचा दूध माफियांना मोठा झटका; तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली 43 लाखांचा माल जप्त

FDA Raid: महाराष्ट्रात अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या थेट आदेशानुसार राज्यात 2 दिवसांची विशेष मोहीम राबवण्यात आली. या धडक कारवाई दरम्यान राज्यातील वेगवेगळ्या भागांत छापे टाकून सुमारे 43,31,000 रुपयांचा संशयास्पद तसेच भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. आरोग्यास घातक ठरू शकणारा हा संपूर्ण साठा प्रशासनाने जागेवरच नष्ट केला असून, नियम मोडणाऱ्या हॉटेल आणि ढाब्यांवरही कायदेशीर बडगा उगारला आहे.

14 हजार किलोहून अधिक दुग्धजन्य पदार्थ जप्त 
प्रशासनाने 6 आणि 7 जुलै रोजी संपूर्ण राज्यात ही विशेष तपासणी मोहीम हाती घेतली होती. या अवघ्या 48 तासांच्या कारवाईत 24,632 लिटर भेसळयुक्त दूध आणि 14,064 किलो इतर दुग्धजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या दूध माफियांच्या विरोधात केवळ अन्न सुरक्षा कायद्यांतर्गतच नव्हे, तर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार कठोर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात एफडीएचा मोठा छापा
या मोहिमेत पुणे विभागात प्रशासनाने मोठी कारवाई केली. दौंड तालुक्यातील 'क्रीमी डिलाईट' या आस्थापनेतून जवळपास 13,88,000 रुपयांचे बटर आणि स्किम्ड मिल्क पावडर जप्त करण्यात आले. यासोबतच आंबेगाव तालुक्यातील शिंगवे (परगाव) येथील 'अथर्व मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स इंडस्ट्रीज'वर छापा टाकून 9,498 लिटर संशयास्पद गायीचे दूध जप्त करून नष्ट करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील 'महालक्ष्मी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स' येथेही कारवाई करत प्रशासनाने 7,634 लिटर संशयित दूध जप्त केले आणि संबंधित डेअरीचा व्यवसाय परवाना तातडीने निलंबित केला.

82 हॉटेल्सची तपासणी; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे परवाने रद्द
दूध डेअरींसोबतच खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या इतर ठिकाणांवरही प्रशासनाची करडी नजर आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून 3 ते 6 जुलै दरम्यान राज्यातील 82 हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांची अचानक तपासणी करण्यात आली. यामध्ये त्रुटी आढळलेल्या 33 नियतकालिकांना सुधारणा करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या, तर अन्न सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या 9 हॉटेलचे परवाने थेट निलंबित करण्यात आले.

हेही वाचा – Crime News : जामिनावर बाहेर येताच मोठं हत्याकांड, बायको-मुलांसह 6 जणांची हत्या; क्रूरकर्माने पोलिसांनाही घाम फोडला

कारवाईची मोहीम अधिक तीव्र होणार; नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन
राज्यातील प्रत्येक नागरिकाला सकस, सुरक्षित आणि चांगल्या दर्जाचे अन्नपदार्थ मिळावेत या उद्देशाने ही विशेष मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. तसेच, आपल्या परिसरात कुठेही अन्नपदार्थांमध्ये किंवा दुधात भेसळ होत असल्याचा संशय आल्यास, नागरिकांनी त्याबाबतची माहिती तातडीने प्रशासनाकडे नोंदवावी, असे आवाहन एफडीएच्या वतीने करण्यात आले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number