Mankhurd Building Collapse Update: मुंबईत रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मानखुर्द भागात एक भीषण दुर्घटना घडली होती. मानखुर्द येथील जनता नगर, न्यू मंडाळा परिसरात 5 जुलै रोजी रात्री सुमारे 8:30 वाजता एक अनधिकृत चार मजली इमारत कोसळली होती. ही इमारत शेजारील झोपडीवर कोसळल्याने झालेल्या या दुर्घटनेत 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे.
अनधिकृत बांधकाम आणि दुर्लक्ष ठरले कारणीभूत
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, कोणत्याही आवश्यक सुरक्षेच्या नियमांचे पालन न करता या 4 मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. ही इमारत गेल्या काही दिवसांपासून अत्यंत धोकादायक अवस्थेत होती, याची कल्पना असूनही संबंधितांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. तसेच शेजारील झोपडीच्या सुरक्षेसाठीही कोणतेही उपाय केले गेले नव्हते. या निष्काळजीपणामुळेच ही इमारत कोसळून मोठी जीवितहानी झाली असून, याप्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात गु.र.क्र. 425/2026 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मालक आणि कंत्राटदारावर कडक कारवाई
पोलिसांनी याप्रकरणी कडक पावले उचलत इमारतीचे मालक, बांधकामाशी संबंधित कंत्राटदार, झोपडी मालक आणि या अनधिकृत बांधकामाला पाठींबा देणाऱ्या खाजगी व शासकीय व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर प्रकरणात निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल 2 आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक केली असून, या घटनेचा पुढील तपास मानखुर्द पोलिसांकडून वेगाने सुरू आहे.
मृतांचा अधिकृत आकडा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेतील बाधितांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शताब्दी रुग्णालयात आणलेल्या 4 महिला आणि 1 पुरुषाला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर राजावाडी रुग्णालयात आणखी 1 पुरुषाला मृत घोषित करण्यात आले. सध्या 1 जखमी व्यक्तीवर पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरुवातीच्या प्राथमिक माहितीमध्ये मृतांचा आकडा 7 सांगितला गेला होता, मात्र रुग्णालयीन नोंदीनुसार एकूण 6 जणांचा मृत्यू झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.