Giribala Singh Arrested: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. या प्रकरणात ट्विशाची सासू आणि माजी न्यायाधीश गिरिबाला सिंह यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अटक केली आहे. सुमारे साडेसहा तास चाललेल्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली. अटकेनंतर त्यांना लवकरच न्यायालयासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे. गुरुवारी सकाळीच CBI चे पथक भोपाळमधील कटारा हिल्स परिसरातील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते.
उच्च न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज
यापूर्वी बुधवारी मध्यरात्रीनंतर जबलपूर उच्च न्यायालयाने गिरिबाला सिंह यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. या निर्णयानंतर त्यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली जात होती. न्यायालयाच्या आदेशानंतर काही तासांतच CBI चे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.
राज्य सरकारच्या याचिकेनंतर तपास CBI कडे
भोपाळमधील बाग मुगालिया एक्स्टेंशन परिसरातील HIG-311 या निवासस्थानी CBI पथकाने तपासासाठी भेट दिली. सुरुवातीला 15 मे रोजी सत्र न्यायालयाने गिरिबाला सिंह यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. मात्र, मध्य प्रदेश सरकारने या निर्णयाला विरोध करत उच्च न्यायालयात धाव घेतली. राज्य सरकारच्या याचिकेनंतरच या प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवण्यात आला होता.
ट्विशाच्या पतीसह सासूलाही अटक
या प्रकरणात ट्विशाचा पती समर्थ याला यापूर्वीच अटक करण्यात आली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. आता गिरिबाला सिंह यांच्या अटकेनंतर या प्रकरणातील दोन्ही प्रमुख आरोपींवर कारवाई झाली आहे. CBI कडून दोघांची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले की, प्रकरणातील तथ्ये आणि गिरिबाला सिंह यांच्यावरील गंभीर आरोप लक्षात घेता त्यांना दिलेला अटकपूर्व जामीन योग्य नव्हता. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द करत उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन रद्दबातल ठरवला.
CBI कडून घटनास्थळी नाट्यरूपांतर
दरम्यान, बुधवारी संध्याकाळी CBI ने ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात घटनास्थळी जाऊन नाट्यरूपांतर केले. ट्विशाने गळफास घेतल्याचा दावा करण्यात आलेल्या गच्चीची अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तसेच, गिरिबाला सिंह यांच्या निवासस्थानी समर्थ आणि गिरिबाला सिंह यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. तपास अधिक सखोल करण्यासाठी पुढील काही दिवसांत आणखी चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.