मुंबई: राज्यातील हवामानात अचानक बदल होण्याचे संकेत मिळत असून, प्रचंड उष्णतेनंतर आता काही भागांत वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेषतः दुपारनंतर आभाळ दाटून येणे, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे यांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता पुढील काही दिवस राहणार आहे.
आज म्हणजेच 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, उत्तर खानदेश तसेच दक्षिण मराठवाड्यातील काही भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दुपारनंतर हवामानात बदल जाणवू शकतो. आकाश ढगाळ होऊन काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यासोबतच विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा वेगही वाढू शकतो.
20 ते 22 एप्रिलदरम्यान या पावसाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, पुणे विभाग, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
विदर्भात उष्णतेचा कहर अद्यापही कायम आहे. वर्धा येथे तापमानाने तब्बल ४५ अंश सेल्सियसचा टप्पा गाठला असून, यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच इतका उच्चांक नोंदवला गेला आहे. नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही तापमान ४३ ते ४४ अंशांच्या दरम्यान असल्याने नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
केवळ दिवसभरच नव्हे, तर रात्रीही उष्णतेची झळ कमी होत नाही. किमान तापमानातही वाढ झाल्याने नागरिकांना विश्रांती मिळत नाही. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असा सल्ला दिला आहे.
पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम आणि यवतमाळ या भागांत पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. मात्र, नागपूर आणि पूर्व विदर्भात सध्या पावसाची शक्यता कमी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.