Maharashtra Floods: महाराष्ट्रातील बीड, मराठवाडा, अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर आणि परभणीसह अनेक भागांमध्ये सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे आणि अनेक गावांमध्ये नागरिक पाण्याखाली अडकले आहेत. प्रशासनाकडून मदत व बचावकार्य वेगाने सुरू असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे सुमारे 8 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या 17 तुकड्या त्या भागात कार्यरत आहेत. बीडमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून, धाराशिवमध्ये 27 लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे. याव्यतिरिक्त सुमारे 200 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले गेले आहे.
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितलं की, 'सध्या पाऊस सरासरीपेक्षा 102 टक्के जास्त पडला आहे. लोक अडकले आहेत आणि प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री तिथे पोहोचले आहेत आणि अतिरिक्त हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. मदत पोहोचवण्याचे काम सातत्याने सुरू आहे.' दरम्यान, शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन फडणवीस म्हणाले की, काही आठवड्यांपूर्वी केलेल्या पंचनाम्यानुसार आतापर्यंत 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांना 2215 कोटी रुपयांची मदत मंजूर झाली आहे. त्यातील 1829 कोटी जिल्ह्यात जमा झाले असून, पुढच्या आठ ते दहा दिवसांत उर्वरित रक्कमही जमा केली जाईल. मृत्यू झालेल्या कुटुंबांना तसेच पुरग्रस्त लोकांना तातडीने मदत मिळेल.
हेही वाचा – Maharashtra Flood : पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! 31.64 शेतकऱ्यांसाठी 2 हजार 215 कोटी रुपयांची मदत मंजूर
याशिवाय, मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांना मदत पोहोचवण्याचा अधिकार दिला आहे. उद्या पालकमंत्र्यांना आणि मंत्र्यांना पूरग्रस्त भागाची भेट देण्याचे निर्देश आहेत. मी स्वतःही काही भागांना भेट देणार आहे. मुसळधार पावसामुळे बीड, सोलापूर, जळगाव, परभणी आणि अहिल्यानगरमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतत रेस्क्यू व मदत कार्यात गुंतलेली आहे.