Maharashtra Board SSC Result 2026 Date : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, 8 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. या निकालाबाबतची अधिकृत वार्ताहर परिषद उद्या सकाळी 11 वाजता राज्य मंडळ कार्यालयात पार पडणार असून, त्यानंतर विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येईल. या घोषणेमुळे राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक वाढली असून, गेल्या अनेक दिवसांपासून निकालाची लागलेली प्रतीक्षा अखेर उद्या संपणार आहे.
दहावीचा निकाल उद्या; ऑनलाईन गुण पाहण्यासाठी विद्यार्थी सज्ज
नुकताच 2 मे 2026 ला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाकडून बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. आता दहावीच्या निकालाचे वेध लागले आहेत. यंदा महाराष्ट्र एसएससी परीक्षेला 16.15 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. गेल्या वर्षी या परीक्षेतील एकूण उत्तीर्णतेचे प्रमाण 94.10 टक्के होते. तर, 2024 मधील एकूण उत्तीर्णतेचे प्रमाण 95.81 टक्के होते.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, इयत्ता दहावीचा निकाल 8 मे रोजी प्रसिद्ध होणार आहे. दुपारी 1:00 वाजता हा निकाल ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिला जाईल. परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे विषयनिहाय गुण आणि एकूण टक्केवारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल. यावर्षी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा या ऑनलाईन निकालानंतर संपणार असून, गुणपत्रिका पाहण्यासाठी विविध संकेतस्थळांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल
1. https://results.digilocker.gov.in
2. https://mahahsscboard.in
3. https://sscresult.mkcl.org
4. https://www.tv9marathi.com
5. hscresult.mkcl.in
(टीप : आपला रोल नंबर आणि आईचे नाव तयार ठेवावे.)
गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी अर्ज प्रक्रिया
निकालात मिळालेल्या गुणांबाबत काही शंका असल्यास, विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सोय मंडळाने दिली आहे. https://mahahsscboard.in या संकेतस्थळावरून स्वतः किंवा शाळेमार्फत हे अर्ज करता येतील. या प्रक्रियेसाठी काही महत्त्वाचे मुद्दे :
– अर्जाचा कालावधी: गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी शनिवार, 9 मे 2026 ते शनिवार, 23 मे 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.
– ऑनलाईन शुल्क: अर्जाचे शुल्क Debit Card, Credit Card, UPI किंवा Net Banking द्वारे भरता येईल.
– पुनर्मूल्यांकन: श्रेणी विषयांव्यतिरिक्त इतर कोणत्याही अनिवार्य विषयासाठी पुनर्मूल्यांकनाचा अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
– सूचना: अर्ज करण्यापूर्वी संकेतस्थळावर देण्यात आलेल्या अटी, शर्ती आणि सविस्तर सूचनांचे वाचन करणे आवश्यक आहे.