LPG Cylinder Booking: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, देशांतर्गत इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारने एलपीजी (LPG) बुकिंगच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. 'भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड'ने (BPCL) जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, आता एका ग्राहकाला एका महिन्यात जास्तीत जास्त केवळ 2 सिलिंडर्स बुक करता येतील. गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठा मर्यादित ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून, सर्व ग्राहकांसाठी हे नियम जाणून घेणे अनिवार्य आहे.
वार्षिक कोटा आणि बुकिंगमधील अंतरात बदल
नवीन नियमांनुसार, एका आर्थिक वर्षात (1 एप्रिल ते 31 मार्च) ग्राहकाला 12 अनुदानित (सबसिडी असलेले) सिलिंडर्स मिळतील. जर एखाद्या कुटुंबाला अधिक गॅसची गरज भासली, तर ते जास्तीत जास्त 3 बिगर-अनुदानित सिलिंडर्स खरेदी करू शकतात. म्हणजेच, एका कनेक्शनवर वर्षाला एकूण 15 सिलिंडर्सची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दोन सिलिंडर बुकिंगमधील प्रतीक्षा कालावधी आता 21 दिवसांवरून वाढवून 25 दिवस करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता पुढील बुकिंगसाठी आधीपेक्षा जास्त काळ वाट पाहावी लागेल.
अतिरिक्त सिलिंडर हवा असल्यास द्यावी लागेल माहिती
जर तुमचा वार्षिक 12 सिलिंडर्सचा कोटा संपला असेल आणि तुम्हाला अधिक सिलिंडर हवे असतील, तर त्यासाठी 'Hello BPCL' या मोबाईल ॲपचा वापर करावा लागेल. या ॲपद्वारे ग्राहकांना काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, जसे की घरी लग्नसमारंभ किंवा मोठा कार्यक्रम आहे का? आणि पाहुण्यांची संख्या किती आहे? तुमच्या उत्तरांच्या आधारे पडताळणी झाल्यानंतरच तुम्हाला अतिरिक्त सिलिंडर मिळण्यास पात्र ठरवले जाईल. ही नवीन प्रणाली पारदर्शकता आणण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
OTP आधारित डिलिव्हरी आणि e-KYC अनिवार्य
आता सिलिंडरची डिलिव्हरी घेताना सुरक्षिततेसाठी 'ओटीपी' (DAC) प्रणाली लागू करण्यात आली आहे. ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला कोड डिलिव्हरी बॉयला सांगितल्याशिवाय सिलिंडर मिळणार नाही. तसेच, शासनाने सर्व घरगुती ग्राहकांसाठी e-KYC अनिवार्य केले आहे. ज्या ग्राहकांचे केवायसी अद्ययावत नसेल, त्यांचे अनुदान (सबसिडी) रोखले जाऊ शकते. त्यामुळे ग्राहकांनी आपला मोबाईल क्रमांक आणि केवायसी तपशील गॅस एजन्सीकडे त्वरित अपडेट करणे आवश्यक आहे.