ओतूर : कल्याण-अहमदनगर महामार्गावरील जुन्नर आणि अकोले तालुक्याच्या सीमेवरील खामुंडी ते बदगी-बेलापूर रस्त्यावरील घाटात एका अज्ञात महाभागाने बिबट्याचे चार बछडे बॉक्समध्ये भरून बेवारसपणे सोडून दिले होते. यानंतर या बछड्यांची आई बिबट चवताळण्याची भीती व्यक्त केली जात होती… आणि असाच प्रकार घडला आहे. या घटनेनंतर एका बिबट्याने एका दुचाकीवर हल्ला केला. यामध्ये दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. हल्ला करणारी तीच मादी बिबट असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
शनिवारी (20 सप्टेंबर) रात्री साडेसातच्या सुमारास पप्पू बाळू दुधवडे (वय 36, रा. म्हसंवडी, ता. अकोले) हे दुचाकीवरून घरी परत येत असताना, बदगी ते बेलापूर रस्त्यावर भिसे वस्तीजवळ बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून बिबट मादीचा आक्रोश अनेक नागरिकांनी ऐकला होता, आणि हा हल्ला त्याच मादीने केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पिल्लं हरवल्याच्या घटनेमुळे सैरभैर झालेली मादी बिबट्या आपल्या बछड्यांना शोधत होती आणि त्याच वेळी तिने एका व्यक्तीवर हल्ला केला, ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ओतूर परिसरात बिबट्यांची दहशत वाढली
ओतूर आणि परिसरात बिबट्यांची दहशत वाढल्याचे दिसून येत आहे. रविवारी (21 सप्टेंबर) रात्री अहिनवेवाडी फाट्याजवळ शेखर वसंतराव डुंबरे यांच्या बंगल्यासमोर त्यांच्या पाळलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला उचलून नेले. याआधी ओतूरमधील देवगल्लीतही बिबट्याने दोन कुत्र्यांवर हल्ला केला होता. नुकतेच रोहकडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान देण्यात आले. एकूणच, या भागात बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हेही वाचा – Shirur: ग्रामदैवतेला प्रदक्षिणा घालताना बैल उधळले अन्… , शिरुरमधील दुर्घटना
वन विभागाची कारवाई
दरम्यान, खामुंडी-बदगी या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी येथे बिबट्याची पिल्लं असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी खामुंडीतील ग्रामस्थांना दिली होती. यानंतर ग्रामस्थांनी पाहणी केली असता बिबट्याचे हे बछडे आढळून आले.
खामुंडी येथील ग्रामस्थांनी बिबट्याच्या बछड्यांची माहिती ओतूर वनविभागाला दिली. त्यानंतर वनपाल सारिका बुट्टे आणि जुन्नरचे आरएफओ प्रदीप चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बछड्यांना ताब्यात घेऊन माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात दाखल केले आहे. हे बछडे केवळ 15 दिवसांपूर्वी जन्माला आल्याचे सांगण्यात येत आहे.
बछड्यांची आईपासून ताटातूट करणाऱ्याचा शोध सुरूच
बछडे खोक्यात घालून बेवासरपणे सोडणाऱ्या महाभागाचा शोध केला जात आहे. वन अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे त्या व्यक्तीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे समजते. तसेच, बिबट मादीचा शोध करून तिची आणि तिच्या पिल्लांची पुन्हा भेट घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. बछडे हरवलेल्या मादीचा आक्रोश जर कोणाला आढळला, तर लगोलग ही बाब वनविभागाला कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकाच वेळी सर्व बछडे दुरावल्याने बिबट मादी अजूनही सैरभेर अवस्थेत असण्याची शक्यता आहे.
वनविभागापुढे बिबट मादीच्या शोधाचे आव्हान
– बछडे बॉक्समध्ये भरून कोणी बदगी घाटात बेवारसपणे सोडले?,
– बछडे कोणत्या भागात सापडले?
– त्यांची आई कुठे मिळू शकेल?
– त्यांना पुन्हा त्यांच्या आईच्या कुशीत विसावता येईल का?
– जर आई मिळून आली नाही तर बछड्यांची आणि आईची अवस्था नक्की कशी असेल?
या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आणि बिबट्याच्या बछड्यांना बेवारस खोक्यात घालून सोडून देणाऱ्या व्यक्तीला शोधण्याचे आव्हान वनविभागापुढे उभे राहिले आहे. त्या बछड्यांचे संगोपन व आरोग्य जपण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त हाती आले आहे.
हेही वाचा – Woman Rescue: सोलापूरमध्ये सीना नदीत पडलेल्या महिलेचे धाडसी तरुणांनी वाचवले प्राण; पहा व्हायरल व्हिडिओ