Ashadhi Wari MSRTC Revenue: महाराष्ट्राची महान भक्तीपरंपरा असलेल्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी दरवर्षी लाखो भाविक पंढरीच्या दिशेने रवाना होतात. या वर्षीच्या आषाढी यात्रेतही 'लालपरी' म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) वारकऱ्यांच्या प्रवासाची धुरा अत्यंत यशस्वीपणे सांभाळली. राज्यभरातील विविध भागांतून पंढरपूरकडे येणाऱ्या भाविकांसाठी एसटीने केलेल्या चोख नियोजनामुळे तब्बल 9,24,738 वारकऱ्यांनी अत्यंत सुखरूप आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव घेतला. विठुरायाच्या दर्शनाची आस उराशी बाळगून निघालेल्या भक्तांसाठी एसटीची सेवा यंदाही सर्वात मोठा आधारवड ठरली आहे.
41 कोटींहून अधिक महसूल
आषाढी वारीच्या काळात भाविकांची गर्दी लक्षात घेता, प्रशासनाने मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्याच्या प्रमुख विभागांतून एकूण 5,500 विशेष बसेसची सोय केली होती. या कालावधीत लालपरीच्या तब्बल 21,527 यशस्वी फेऱ्या पूर्ण झाल्या. वारकऱ्यांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीत तब्बल 41.18 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात 5.30 कोटी रुपयांची लक्षणीय वाढ झाली असल्याची अधिकृत माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
हेही वाचा – Raigad NCP Vs BJP : रायगडमध्ये उलथापालथ! माजी नगराध्यक्षाची राष्ट्रवादीत घरवापसी; भाजपला मोठा धक्का
'वाहतूक नव्हे, ही तर साक्षात विठ्ठलसेवा'; कर्मचाऱ्यांच्या श्रमाचे कौतुक
या यशावर भाष्य करताना परिवहन मंत्र्यांनी सांगितले की, मुखात विठ्ठलनाम आणि गळ्यात तुळशीची माळ घेऊन पंढरीकडे निघणाऱ्या भक्तांना सुरक्षितपणे पोहोचवणे आणि दर्शनानंतर सुखरूप घरी आणणे ही केवळ एक वाहतूक सेवा नसून ती साक्षात पांडुरंगाची सेवा आहे. अहोरात्र परिश्रम करणाऱ्या चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या समर्पणामुळेच हे शक्य झाले आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक ऐक्याचे प्रतीक असलेल्या या यात्रेत एसटीने पुन्हा एकदा आपली अढळ विश्वासार्हता सिद्ध करत सेवेचा आणि उत्पन्नाचा नवा वस्तुपाठ घालून दिला आहे.