Koyna Dam Water Level: पश्चिम महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे पुनरागमन झाल्यामुळे धरणातील जलसाठ्यात लक्षणीय सुधारणा झाली आहे. गेल्या 2 दिवसांत धरण परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे पाणीसाठ्यात तब्बल 4 TMC ची वाढ नोंदवण्यात आली असून, सध्या धरणातील एकूण साठा 57.42 TMC वर पोहोचला आहे. एकूण 105 TMC साठवण क्षमता असलेले कोयना धरण आता 54.56 टक्के भरले असून, त्यातील जिवंत पाणीसाठा 52.30 टक्के इतका आहे. धरण परिसरात झालेल्या पावसाची आणि आवकेची सद्यस्थिती अशी आहे –
– महाबळेश्वर येथील पाऊस: 53 मिमी
– कोयना धरण परिसर पाऊस: 48 मिमी
– नवजा परिसर पाऊस: 46 मिमी
– धरणात येणाऱ्या पाण्याची आवक: 27,129 क्युसेक (या वेगाने धरणात दिवसाला सुमारे 0.87 TMC पाणीसाठा वाढू शकतो).
– सध्याचा विसर्ग: धरणातून सध्या कोणत्याही प्रकारचा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही.
चांदोली पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी आणि पाण्याची चिंता मिटली
पावसाने सुरुवातीला दिलेल्या ओढल्यामुळे वारणा (चांदोली) धरणात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, कारण धरणात केवळ 11 TMC पाणी शिल्लक उरले होते आणि त्यापैकी वापरण्यायोग्य पाणी अवघे 4 TMC होते. मात्र, मध्यंतरीच्या विश्रांतीनंतर पाणलोट क्षेत्रात सलग अतिवृष्टी सुरू झाल्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सद्यस्थितीत वारणा धरणाची पाणीपातळी 613.10 मीटरवर पोहोचली असून एकूण 22.24 TMC पाणीसाठ्यापैकी उपयुक्त साठा 15.36 TMC इतका झाला आहे.
धरण परिसरात पावसाचा वाढता जोर
चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज, निवळी आणि धनगरवाडा भागात पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे. धरण परिसरात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असून पाथरपुंज या ठिकाणी तब्बल 113 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या मुसळधार पावसामुळे धरणात सध्या 6655 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून पाणी पातळी सातत्याने वाढत आहे. येत्या काळात पावसाचा हाच जोर कायम राहिल्यास पश्चिम महाराष्ट्रातील धरणांचा जलसाठा अधिक वेगाने वाढण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील इतर धरणांची स्थिती
कृष्णा नदी आणि कोयना पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर अद्याप मर्यादित असला, तरी सांगलीतील आयर्विन पुलाजवळ नदीची पातळी सध्या 7 फूट वर स्थिर आहे. यावर्षीच्या मोसमी पावसामुळे कोयना धरणात आतापर्यंत 44 TMC नवीन पाणीसाठ्याची भर पडली आहे. कोयनासोबतच भागातील इतर प्रमुख धरणांमध्येही पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला असून, त्यांची आकडेवारी अशी आहे –
वारणा धरण: 22.24 TMC
अलमट्टी धरण: 92.59 TMC
दूधगंगा धरण: 9.45 TMC
धोम धरण: 8.44 TMC
कण्हेर धरण: 8.79 TMC
उरमोडी धरण: 6.26 TMC
राधानगरी धरण: 5.88 TMC
धोम बलकवडी धरण: 3.26 TMC
तारळी धरण: 3.24 TMC
तुळशी धरण: 2.06 TMC
पाटगाव धरण: 1.92 TMC
कासारी धरण: 1.67 TMC
हेही वाचा – Satara Waterfalls : साताऱ्यातील धबधब्यांचा मनमोहक नजारा; निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी