Kolhapur-Sangli Highway : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर-सांगली रस्ता चौपदरीकरणाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. तांत्रिक कारणांमुळे जुनी निविदा रद्द झाल्यानंतर, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) या 33 कि.मी. अंतराच्या रस्त्यासाठी 937 कोटी रुपयांची नवीन निविदा जाहीर केली आहे. यामुळे या दोन्ही महत्त्वाच्या शहरांमधील प्रवास अधिक सुकर आणि वेगवान होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
जुनी निविदा रद्द आणि नव्या प्रक्रियेला सुरुवात
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील सांगली फाटा ते अंकली या टप्प्यातील चौपदरीकरणाची जुनी निविदा नुकतीच रद्द केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पासाठी हिरवा कंदील दाखवल्यानंतर, 17 फेब्रुवारी 2026 रोजी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा संपूर्ण प्रकल्प 'हायब्रीड अॅन्युटी मोड' (HAM) अंतर्गत राबवला जाणार आहे. सध्याच्या नियोजनानुसार, सांगली फाटा ते चोकाक हा 7.738 किलोमीटर आणि चोकाक ते अंकली असा 25.871 किलोमीटर मिळून एकूण 33.609 किलोमीटर लांबीचा रस्ता चौपदरी केला जाईल.
निविदा प्रक्रियेचे वेळापत्रक आणि प्रतीक्षा
नव्याने जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, इच्छुकांना 6 एप्रिल 2026 पर्यंत आपल्या निविदा सादर करता येणार आहेत. त्यानंतर, 7 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता तांत्रिक बीड (Technical Bid) उघडले जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आर्थिक निविदा (Financial Bid) उघडून अंतिम ठेकेदाराची निवड केली जाणार आहे. गेली अनेक वर्षे केवळ डागडुजीवर अवलंबून असलेल्या या मार्गावरील वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आता नवीन निविदा प्रसिद्ध झाल्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यासाठी वाहनधारकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.