Direct Tax Collection : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात (Direct Tax Collection) मोठी वाढ झाली असून सरकारी तिजोरीत मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाला आहे. प्राप्तिकर विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 1 एप्रिल ते 17 डिसेंबर 2025 या कालावधीत देशाचा निव्वळ प्रत्यक्ष कर संग्रह 8 टक्क्यांनी वाढून 17.05 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच काळात हा आकडा 15.78 लाख कोटी रुपये इतका होता.
कर संकलनातील प्रमुख आकडेवारी
– आर्थिक हालचालींमधील चढ-उतार असूनही कर संकलनाचा पाया भक्कम असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.
– एकूण कर संकलन (Gross Collection): वार्षिक आधारवर 4.16 टक्क्यांनी वाढून ते 20.01 लाख कोटी रुपये झाले आहे.
– कॉर्पोरेट कर: कंपन्यांच्या नफ्यात वाढ झाल्याने कॉर्पोरेट कर संकलन 7,39,353 कोटींवरून थेट 8,17,310 कोटी रुपयांवर गेले आहे.
– वैयक्तिक प्राप्तिकर: पगारदार वर्ग आणि व्यावसायिकांकडून मिळणारा कर 7,96,181 कोटींवरून वाढून 8,46,905 कोटी रुपये झाला आहे.
रिफंडमध्ये घट आणि निव्वळ उत्पन्नात वाढ
निव्वळ कर संकलन वाढण्यामागे कर परताव्यातील (Refund) घट हे एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. या वर्षात आतापर्यंत 2,97,069 कोटी रुपयांचा रिफंड जारी करण्यात आला आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 13.5 टक्क्यांनी कमी आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 3,43,499 कोटी रुपयांचा परतावा दिला गेला होता. रिफंडची रक्कम कमी झाल्यामुळे सरकारच्या हातात राहणारा निव्वळ महसूल आपोआपच मजबूत झाला आहे.
अॅडव्हान्स टॅक्समधून सरकारी तिजोरीला आधार
चालू आर्थिक वर्षात 'अॅडव्हान्स टॅक्स' संकलनातही 4.27 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असून तो 7,88,388 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यामध्ये कॉर्पोरेट अॅडव्हान्स टॅक्समध्ये 8 टक्क्यांची वाढ होऊन तो 6,07,300 कोटी रुपये झाला आहे. मात्र, नॉन-कॉर्पोरेट अॅडव्हान्स टॅक्समध्ये किरकोळ घट दिसून आली आहे. कर रचनेतील सुधारणा आणि परतावा प्रक्रियेतील सुसूत्रता यामुळे ही वाढ शक्य झाली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
आर्थिक मजबुतीचे सकारात्मक संकेत
केंद्र सरकारने टॅक्स स्लॅबमध्ये दिलेला दिलासा आणि रिफंड प्रक्रियेत आणलेली गती यांचा सकारात्मक परिणाम आता स्पष्टपणे दिसत आहे. जरी आर्थिक विकासाचा वेग काहीसा मर्यादित असला, तरी कर संकलनातील ही 8 टक्क्यांची वाढ भारतीय अर्थव्यवस्थेच्या अंतर्गत मजबुतीचे लक्षण मानली जात आहे. यामुळे आगामी अर्थसंकल्पापूर्वी सरकारची आर्थिक स्थिती अधिक भक्कम झाली आहे.
हेही वाचा – Rupee Vs Dollar: रुपयाचा कमबॅक! डॉलरच्या तुलनेत रूपया 89 च्या पातळीवर पोहोचला