Fat Jail Concept : जगात एक असा देश आहे जिथे लोक गुन्हेगार नसतानाही स्वतःहून तुरुंगात जाण्यासाठी पैसे मोजतात. या ठिकाणाला ‘फॅट जेल’ (Fat Jail) म्हणून ओळखले जाते. लठ्ठपणाने त्रस्त असलेल्या लोकांसाठी हा एक विशेष आणि अत्यंत कठोर ‘वेट लॉस कॅम्प’ असून, येथे वजन कमी करण्यासाठी अत्यंत काटेकोर शिस्त पाळावी लागते. दिसायला एखाद्या खऱ्या तुरुंगासारखीच असलेली ही जागा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
कैदेत असल्यासारखा अनुभव
या कॅम्पची रचना आणि नियम एखाद्या खऱ्या जेलसारखेच आहेत. उंच भिंती, मोठे लोखंडी गेट आणि बाहेरील जगाशी संपर्क तोडणारे निर्बंध यामुळे येथे राहणाऱ्यांना आपण कैदेत असल्याचा अनुभव येतो. एकदा का तुम्ही या जेलमध्ये प्रवेश केला की, तुम्हाला सलग 28 दिवस बाहेर पडण्याची परवानगी नसते. ही विचित्र वाटणारी घटना नेहमीच विचित्र गोष्टींसाठी चर्चेत येणाऱ्या चीनमध्ये घडत आहे. इन्स्टाग्रामवरील प्रसिद्ध व्हिडिओ मेकर टीएल हुआंग यांनी या कॅम्पचा अनुभव सांगताना नमूद केले की, त्यांनी संपूर्ण 28 दिवस बाहेरील जग पाहिलेही नाही आणि हा अनुभव मानसिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक होता.
कठोर दिनचर्या आणि आहार
या जेलमध्ये राहणाऱ्यांना दररोज 4 तास कष्टदायक शारीरिक व्यायाम-प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये हाय-इंटेन्सिटी ट्रेनिंग आणि एरोबिक्ससारख्या व्यायामांचा समावेश असतो. जेवणाच्या बाबतीतही येथे कडक नियम आहेत.
प्रतिबंधित पदार्थ: बाहेरून कोणतेही खाद्यपदार्थ आणण्यास सक्त मनाई असून प्रवेशाच्या वेळीच सर्व प्रतिबंधित वस्तू जप्त केल्या जातात.
नियंत्रित आहार: दिवसातून फक्त 3 वेळा ठराविक प्रमाणातच जेवण दिले जाते. यामध्ये प्रामुख्याने भाजलेल्या भाज्या, गाजर आणि ‘ब्रेज्ड डक’ सारख्या संतुलित पदार्थांचा समावेश असतो.
वजन तपासणी: दररोज सकाळी वजन तपासले जाते, जेणेकरून प्रगतीवर लक्ष ठेवता येईल.
खर्च आणि लोकप्रियता
चीनमधील या फॅट जेलमध्ये राहण्यासाठी प्रत्येकाला सुमारे 89,000 रुपये खर्च करावे लागतात. कमी कालावधीत वजन कमी करण्यासाठी ही पद्धत प्रभावी ठरत असल्याचा दावा केला जात असला तरी, अनेक जण याला अतिशय अमानवीय आणि कडक मानतात. शिस्तप्रिय जीवनशैलीमुळे अनेकांचे वजन झपाट्याने कमी होत असल्याने या कॅम्पची लोकप्रियता वाढली आहे; मात्र, त्याचवेळी त्याच्या कठोर नियमांमुळे वादही निर्माण झाले आहेत.
हेही वाचा – Mercedes-Benz Burial : अंत्यसंस्कारांची अजब तऱ्हा! दीड कोटींची मर्सिडीज कार जमिनीत पुरली; मग…