KL Rahul Record: इंडियन प्रीमियर लीग 2026 (IPL 2026) मध्ये शनिवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर धावांचा पाऊस पाहायला मिळाला. दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर केएल राहुलने आपल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर क्रिकेट विश्वात इतिहास रचला आहे. राहुलने केवळ 67 चेंडूंमध्ये 226.87 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 152 धावांची अविश्वसनीय खेळी साकारली. यासह आयपीएलच्या इतिहासात 150 हून अधिक धावांची वैयक्तिक खेळी करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे.
मॅक्युलम आणि गेलच्या पंक्तीत स्थान
IPL च्या इतिहासात 152 हून अधिक धावांचा टप्पा ओलांडणारा केएल राहुल हा जगातील केवळ तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्युलमने पहिल्याच हंगामात नाबाद 158 आणि वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने 2013 मध्ये 175 धावांची खेळी केली होती. तब्बल 13 वर्षांनंतर एखाद्या खेळाडूला आयपीएलमध्ये दीडशे धावांचा आकडा पार करता आला आहे.
अभिषेक शर्माचा विक्रम मोडीत
राहुलने या खेळीसह अभिषेक शर्माचा विक्रम मोडीत काढला आहे. अभिषेकने 2025 मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध 141 धावा केल्या होत्या, जो आतापर्यंतचा कोणत्याही भारतीयाचा सर्वोच्च स्कोअर होता. पंजाब किंग्सविरुद्धच्या या सामन्यात राहुलने 10 चौकार आणि 9 उत्तुंग षटकार ठोकले. विशेष म्हणजे, राहुलने केवळ 46 चेंडूंमध्येच आपले शतक पूर्ण केले. हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 6 वे शतक ठरले असून ख्रिस गेलच्या सर्वाधिक शतकांच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली आहे.
The numbers speak for themselves! ? A KL-assic of the highest order ? Relive ▶️ https://t.co/CDBc0lXGsa#TATAIPL | #KhelBindaas | #DCvPBKS | @klrahul | @DelhiCapitals pic.twitter.com/DZaSEJKMdy — IndianPremierLeague (@IPL) April 25, 2026
नितीश राणासोबत द्विशतकी भागीदारी
या सामन्यात राहुलला नितीश राणाची उत्तम साथ लाभली. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 220 धावांची विशाल भागीदारी रचली. नितीश राणानेही आक्रमक पवित्रा घेत 44 चेंडूंमध्ये 91 धावा ठोकल्या, ज्यामध्ये 11 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने 2 गड्यांच्या मोबदल्यात 264 धावांचा डोंगर उभा केला. राहुलच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे दिल्लीच्या संघाने सामन्यावर आपली पकड घट्ट केली आहे.